‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ असे घोषवाक्य घेऊन आलेला दिग्दर्शक महेश लिमये यांचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट त्याच्या शीर्षकापासूनच वेगळा वाटतो आहे. दिग्दर्शकीय पदार्पण झाल्यानंतर आठ वर्षांनी महेश लिमये यांनी अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी अशी वेगळीच जोडी घेऊन ‘जग्गू आणि ज्युलिएट’सारखा विनोदी धाटणीचा प्रेमपट आणला आहे. या सिनेमाच्या संकल्पनेपासून पडद्यावर साकारेपर्यंतच्या पडद्यामागच्या गमतीजमती दिग्दर्शक महेश लिमये, निर्माते पुनीत बालन, अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन मारलेल्या गप्पांदरम्यान उलगडल्या.
अशी झाली जग्गू आणि ज्युलिएटची निवड
‘जग्गू आणि ज्युलिएट’च्या भूमिकेसाठी वैदेही परशुरामी आणि अमेय वाघ यांची निवड करण्यामागचे कारण म्हणजे या दोन्ही कलाकारांमध्ये या पात्रांना रंगवण्यासाठीची एक ऊर्जा दिसून आली, असे महेश लिमये यांनी सांगितले. पुण्याबाहेर पडून पहिल्यांदाच वेगळय़ा धाटणीची भूमिका अमेयला करायला मिळत असल्या कारणाने त्याला मी कथा ऐकवताच त्याने तात्काळ होकार दिला. तर ज्युलिएट अर्थात वैदेही परशुरामीचे फोटो मी पाहिले होते. ज्युलिएटच्या वेशभूषेत तिचे एक फोटो शूट केले आणि हीच या भूमिकेला न्याय देऊ शकते यावर सगळय़ांचे एकमत झाले आणि मला माझे जग्गू – ज्युलिएट भेटल्याचे लिमये यांनी सांगितले.
प्रत्येक नटाने दिग्दर्शकाच्या स्वाधीन व्हावे..
गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघने या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आग्री तरुणाची भूमिका साकारली आहे. पुणेकर असल्याने प्रमाण मराठी भाषेवर पकड असणाऱ्या अमेयने या चित्रपटासाठी अडीच-तीन महिने आग्री भाषा शिकून घेऊन त्या भाषेचा सराव केल्याचे सांगितले. कोणत्याही नटाने त्याच्या भूमिकेची नीट तयारी केली आणि तो दिग्दर्शकांच्या स्वाधीन झाला तर त्या कलाकारासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते, असे ठाम मत अमेयने व्यक्त केले. प्रत्यक्ष चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याआधी आम्ही पात्रांचा अभ्यास केला आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा सराव केल्याचे वैदेही आणि अमेयने सांगितले. या चित्रपटाचा एक खास किस्सा वैदेहीने यावेळी सांगितला. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर माझ्या आईने मला विचारलं, एका नव्या चित्रपटाचं पोस्टर आलं आहे. चित्रपट फार मोठा वाटतो आहे. तू असा एखादा चित्रपट का करत नाहीस? त्यावेळी मलाही या चित्रपटाबद्दल काही कल्पना नव्हती. त्यानंतर मला महेश लिमयेंनी या नव्या चित्रपटात काम करण्याविषयची विचारले. चित्रपटाचे कथानक काय असणार हे ऐकल्यानंतर मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही अत्यंत वेगळी भूमिका असल्याचे लक्षात आले. महेश लिमयेंना माझ्यातील ज्युलिएट लक्षात आली. त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेने आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट सोप्पी केली, असे वैदेहीने सांगितले.
मराठी कलाकार पुढे जात असल्याचा आनंद
हिंदूी चित्रपटसृष्टीत छायाचित्रणकार म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या महेश लिमये यांनी आपल्याला मराठी कलाकारांना या क्षेत्रात पुढे घेऊन जायचे आहे असे सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत रंगभूमीची पार्श्वभूमी असलेले अनेक मातब्बर कलाकार आहेत. आपले कलाकार हिंदूीतही जेव्हा पुढे जाताना दिसतात तेव्हा आपला माणूस पुढे जात असल्याची भावना मनात येते. त्यामुळेच त्यांच्या कलागुणांना वाव देणारे चित्रपट दिग्दर्शित करण्याचा मानस लिमये यांनी व्यक्त केला.
प्रत्येक क्षण मराठी चित्रपटांसाठी महत्त्वाचा
ज्यावेळी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण वेगळय़ा शहरात होत असते, त्यावेळी तेथील हवामानानुसार चित्रीकरण करावे लागते. मराठी चित्रपटांना निर्मितीखर्चासाठी मिळणारी रक्कम मर्यादित असते. आणि बाहेरगावी चित्रीकरणाचा खर्च अधिक असल्याने तिथे अर्धा तासदेखील मराठी चित्रपटांसाठी फार महत्त्वाचा असतो, असे लिमये यांनी सांगितले. या चित्रपटातून दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती कशा प्रवासादरम्यान भेटतात, त्यांच्याबरोबर इतर अनेक प्रवासी एकत्र आल्यानंतर नात्यांची गुंफण कशी होते, नवी नाती कशी तयार होतात, या सर्व गोष्टी उत्तराखंडच्या निसर्गसुंदर वातावरणात चित्रीकरण करत ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे लिमये यांनी सांगितले.
प्रसिद्धीचा योग्य वापर करावा..
बालकलाकार म्हणून काम कारायला सुरुवात केल्यापासून मला अभिनेताच व्हायचे आहे हे मनाशी पक्के ठरले होते. त्यामुळे हळूहळू एकांकिकेकडे वळलो. मात्र, एकांकिका करत असताना असे निदर्शनास आले की इथून पुढे अभिनयाच्या क्षेत्रात वाटचाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढे व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसोबत चित्रपटांकडे मोर्चा वळवल्याचे अमेयने सांगितले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका केल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीचा योग्य वापर करावा असे लक्षात आले. तोवर काम निवडण्याच्या स्तरावर आपण पोहोचलो असल्याने त्याचा योग्य वापर करत पैसे कमी मिळतील हा धोका स्वीकारून चोखंदळ वाटचाल केल्याचेही त्याने स्पष्ट केले.
जग करतं म्हणून नको..
प्रत्येक चित्रपट करताना मी हिंदूी अथवा दाक्षिणात्य चित्रपटांशी स्वत:च्या मराठी चित्रपटाची अभ्यासात्मक तुलना करत असल्याचे महेश लिमये यांनी सांगितले. मराठी चित्रपटांकडे बजेट जरी कमी असले तरी तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण हिंदूी, दाक्षिणात्य किंवा इतर चित्रपटांच्या तोडीस चित्रपट अभ्यासाच्या माध्यमातून तयार करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण म्हणून आपला चित्रपट जगभरात पोहोचवण्यासाठी ते करतात तसं प्रत्येक चित्रपट वेगवेगळया भाषेत उपलब्ध करून देणे गरजेचे नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपटाला भाषा नसते, त्याचे कथानक दिग्दर्शकांनी, कलाकारांनी, छायाचित्रणकाराने कसे मांडले आहे यावर तो चित्रपट लोकांपर्यंत किती – कसा पोहोचतो हे अवलंबून असते. त्यामुळे मराठी चित्रपट इतर भाषांमध्ये डब केले जात नाहीत. चित्रपटाची गरज असल्यास नक्कीच ते करू आणि हिंदूी, दाक्षिणात्य किंवा हॉ़लीवूड ते करतात म्हणून मला डिबग करायचे नाही असे ठाम मतदेखील लिमये यांनी यावेळी मांडले.
चित्रपटगृहात येणारे चाहते महत्त्वाचे..
सध्याच्या युगात समाजमाध्यमांवरील फॉलोवर्स किती यावरून कलाकारांची विश्वासार्हता सिद्ध होते. यावर बोलताना अमेय म्हणाला, समाजमाध्यमावर कलाकारांचे खोटी स्तुती करणारे अनेकजण असतात तुमचा खरा चाहतावर्ग तोच असतो जो तुमचा प्रत्येक चित्रपट किंवा नाटक, चित्रपट अथवा नाटय़गृहांमध्ये जाऊन पाहतात. त्यामुळे मला समाजमाध्यमापेक्षा चित्रपटगृहात जाणारा सच्चा चाहतावर्ग हवा असल्याचे अमेयने सांगितले.
म्हणून चार वर्षांनी हा चित्रपट केला – पुनीत बालन
‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन स्टुडिओजची असून याआधी त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा वेगळय़ा धाटणीचा चित्रपट केला होता. त्यानंतर उत्कृष्ट कथानक असलेल्या चित्रपटाचीच निर्मिती करायची असल्या कारणाने तब्बल चार वर्ष पुनीत बालन स्टुडिओजने एकही चित्रपट केला नसल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले. ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या दोन्ही चित्रपटांत महेश लिमये हा समान धागा होता. या धाग्याने या दोन्ही चित्रपटांना घडवले, अशा शब्दांत बालन यांनी लिमयेंचे कौतुक केले. ‘या चित्रपटाबद्दल एका ओळीत लिमये यांनी मला सांगितले होते आणि ते चित्रपट दिग्दर्शित करणार हे निश्चित असल्याने मी तात्काळ होकार दिला’, असेही बालन यांनी सांगितले. तसेच, आम्हाला वर्षभरात अनेक चित्रपट करायचे, त्यातील जो चित्रपट प्रेक्षकांना आवडेल त्यातून पैसा येईल, अशा विचारातून चित्रपट निर्मिती करायची नव्हती. वर्षभरात एकच पण प्रेक्षकांना आवडेल असाच चित्रपट करायचा हे आपल्या निर्मितीचे तत्त्व असल्याचेही बालन यांनी स्पष्ट केले.