गझल नवाज जगजीत सिंग यांची आज ७२वी जयंती असून हा दिवस गुगल डूडल अनोख्या पध्दतीने साजरा करत आहे.
गुगलने जगजीत सिंग यांचे पेटी वाजवतानाचे छायाचित्र आपल्या सर्च इंजिनवर टाकले आहे.
तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या जगजित सिंग यांनी हजारो गझला गायिल्या आणि अजरामर केल्या. जगजीत सिंग यांचे ८० अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याने भारतात पहिल्यांदा रुजवली. ‘गझल किंग’ म्हणून चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले जगजीत सिंग ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानात श्रीगंगानगर येथे अमरसिंग धीमन आणि बचन कौर यांच्या पोटी जन्मले. धीमन कुटुंब मोठे होते. चार बहिणी आणि दोन भावांसह राहणाऱ्या जगजित सिंगांना घरी जीत म्हणून टोपण नावाने बोलावत. शीख धर्मीय असलेल्या जगजित सिंगांचे जन्मनाव जगमोहन परंतु, वडिलांनी त्यांच्या गुरूच्या सांगण्यावरून जनमोहनचे नाव  जगजित म्हणून नोंदवले. वडिलांनीच मुलाचा संगीताकडे असलेला कल ओळखून पं. छगनलाल शर्मा या अंध संगीत शिक्षकाकडे जगजितला संगीताचे धडे घेण्यासाठी पाठवले. संगीताची एकेक पायरी चढत जगजित सिंग यांनी नंतर सैनिया घराण्याचे उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे ख्याल, ठुमरी आणि ध्रुपद गायकीचे धडे घेतले.
सर्वसामान्य रसिकांपर्यंत गझल पोहोचवणारे जगजीत सिंग यांचे १० ऑक्टोबर २०११ साली मुंबईत निधन झाले होते.

Story img Loader