गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जय भीम’ प्रदर्शित झाला. तमिळनाडूमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दाखवली. प्रकाशझोतात नसलेल्या आदिवासी समूहांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न ‘जय भीम’च्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक टी. जे. ग्नानवेल यांनी केला आहे. पोलिसांकडून होणारा हिंसाचार हा अत्यंत संवेदनशील विषय ताकदीने हाताळल्यामुळे चित्रपटाचे सर्वत्र कौतुकसुद्धा झाले होते. अभिनेता सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका यांनी जय भीमची निर्मिती केली आहे.
‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात तमिळनाडूमधल्या एका व्यक्तीने फसवणूकीचा खटला दाखल केला आहे. याआधीही हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटातील काही दृश्यांमुळे वेन्नीयार समुदायाचा अपमान झाल्याचा आरोप वेन्नीयार संगम संघटनेने केला होता. या प्रकरणामुळे निर्मात्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला होता.
आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, पत्नीने घेतला घटस्फोटाचा निर्णय
व्ही कुल्नजीप्पन नावाच्या माणसाने दिग्दर्शक ग्नानवेल आणि निर्मात्यांविरोधात कॉपीराईट कायदा कलम ६३ (ए) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तमिळनाडूमधील एका आदिवासी व्यक्तीला पोलिस अटक करतात. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रामाणिक वकील मदत करतो. अशी ‘जय भीम’ चित्रपटाची कथा आहे. ही कथा माझ्या आयुष्यावर आधारलेली असल्याचा दावा कुल्नजीप्पनने केला आहे. ‘१९९३ मध्ये कम्मापुरम पोलिसांच्या हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये ग्नानवेल आणि त्यांचे सहकारी मला भेटले. त्यांनी माझ्याकडे असलेली माहिती मिळवली. ५० लाख मानधन आणि नफ्यातील वाटा देण्याचे वचन दिले होते.’ अशी माहिती कुल्नजीप्पनच्या तक्रारपत्रातून मिळाली आहे.
‘जय भीम’ चित्रपटामध्ये सूर्याने अॅड. चंद्रू ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सूर्यासह सेनगानी आणि राजाकन्नू हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. राजीषा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. हा चित्रपट २ नोव्हेंबर २०२१ रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.