मराठी माणूस हा आपल्याच प्रदेशात रमणारा माणूस! मराठी माती, मराठी भाषा आणि मराठमोळी खाद्यसंस्कृती यांचा प्रचंड अभिमान असलेला मराठी माणूस ‘स्थलांतर’ या विषयाबाबत एक तर उदासीन असतो किंवा आक्रमक! पुलंच्या शब्दांत सांगायचं झालं तर, ‘गिरगावातून दादरला बदली झाली, तर ठणाणा करणारी आमची जमात!’ पण अशा मातीतून वर आलेला एक रांगडा मराठी गडी पंजाबमध्ये बठिंडाला जातो, मराठमोळ्या खाद्यपदार्थाचा ढाबा उघडतो आणि छोले, प्राठा, लस्सी यांची सवय असलेल्या पंजाबी माणसाला वांग्याचं भरीत, उकडीचे मोदक, भाजणीचं थालिपीठ, कैरीचं पन्हं अशा अस्सल मराठमोळ्या पदार्थाची चटक लावतो.. एका वाक्याची ही गोष्ट मनात ठेवली, तर वास्तविक ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ हा चित्रपट अतिशय जबरदस्त बनायला हवा होता. पण ढिसाळ पटकथा, तुटक संकलन आणि कॅमेराची सुमार हाताळणी यामुळे तो तसा झालेला नाही.
सयाजी निंबाळकर (अभिजीत खांडकेकर) या मराठी रांगडय़ा सरदाराने पंजाबमध्ये ‘जय महाराष्ट्र ढाबा’ उघडला आहे. या ढाब्याने यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केलं आहे, या नोटवरच चित्रपट सुरू होतो. त्यामुळे ढाबा उभा करायला त्याला काही अडचणी वगैरे आल्या का, तेथील ‘अस्मितावादी’ पक्षांनी ढाबा फोडला का, वगैरे संघर्ष काहीच कळत नाही. मात्र या तरुणाला मराठी मातीचा अभिमान आहे, हे लक्षात येते. वास्तविक मराठी माणूस बाहेरच्या राज्यांत जाऊन उद्योगधंदा करू शकत नाही, या वाक्याला चपराक देण्याचा प्रयत्न अवधुतने केला आहे. तसेच मराठी असो वा पंजाबी असो, माणूस हा माणूस असतो. त्याची नाळ जुळायला फारसा वेळ लागत नाही, हा संदेशही पहिल्यावहिल्या गाण्यातून त्याने दिला आहे.
तर, मराठी मातीचा वगैरे अभिमान बाळगणाऱ्या या सयाजीला बठिंडा रेल्वे स्थानकाबाहेर नुकतीच रेल्वेतून उतरलेली एक सुंदरी जस कौर (प्रार्थना बेहेरे) दिसते. तो तिच्याशी जाऊन थेट बोलतो. तीदेखील (मुंबईची असल्याने) त्याच्याशी मराठीत संवाद साधते. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’
 वगैरे प्रकार होतो. मग त्या दोघांमध्ये गप्पा व्हायला लागतात. इथेच प्रेक्षकांना ठेच लागते. कोणत्याही ओळखीशिवाय एखादी मुलगी एखाद्या मुलाशी एवढय़ा झक्कास गप्पा कशी मारू शकते, असा प्रश्न पडतो. पण कालांतराने याची उत्तरं मिळत जातात. जसविंदर कौरचं लग्न झालेलं असतं, धक्कादायक माहिती त्याला कळते. पुढे काय होतं, तिचं लग्न कोणाशी झालेलं असतं, ती पंजाबला का आणि कशी येते, तिचं आणि सयाजीचं पुढे काही होतं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा चित्रपट अगदी शेवटापर्यंत (म्हणजे शेवटची श्रेयनामावली संपेपर्यंत) पाहायला हवा.
या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपट खूप कमी वेळाचा आहे. मात्र या कमी वेळात अनेक घटना लक्षात ठेवायला लागतात. तसंच पटकथेत जे दुवे कच्चे आहेत, असं चित्रपट पाहताना वाटतं, ते प्रत्यक्षात श्रेय नामावली पाहताना दिग्दर्शकाने चांगलेच जुळवले आहेत. म्हणजेच दिग्दर्शकाला हा चित्रपट मुद्दामच असा बनवायचा होता, हेदेखील लक्षात येतं. पण त्याचं कारण मात्र शेवटपर्यंत कळत नाही. अनेक गोष्टी मुद्दामून जुळवून आणल्यासारख्या वाटतात. आणि मग पंजाबमध्ये जाऊन ढाबा उघडण्याचा सयाजीचा अट्टाहास काहीसा फोल वाटायला लागतो. हा दोष पटकथेचा तसाच तो संकलकाचाही आहे. काही दृष्ये मध्येच कापल्यासारखी वाटतात. त्यांची सांगड शेवटच्या त्या श्रेयनामावलीत घातली जाते.
चित्रपटाचे संवाद हिंदी व मराठी असे दोन्ही भाषांमध्ये आहेत. विशेषत: ‘बेळगाव महाराष्ट्रात का नको’ या विषयावर जसविंदरने घातलेला वाद आणि त्या वेळचे संवाद तर टाळ्या घेणारे आहेत. त्याचप्रमाणे अवधुतने आपलं मराठी अस्मितेविषयीचं मत अत्यंत योग्य, स्पष्ट शब्दांत आणि तरीही समतोल साधून मांडलं आहे.
पंजाबमध्ये चित्रित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांमधील दृष्ये डोक्यात ठेवून हा चित्रपट पाहायला गेलात, तर कदाचित हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण यश चोप्रांनी आपल्या डोळ्यांना जो पंजाब पाहायची सवय लावली आहे, तसा पंजाब काही दिसत नाही. हे छायाचित्रणकाराचे अपयश म्हणावे की, दिग्दर्शकाची दृष्टी, माहीत नाही. पण तरीही सूर्यफुलांची शेतं, फुलांच्या बागा अशा अनेक चांगल्या गोष्टी समोर येतात.
अवधुतचा चित्रपट आणि संगीत यांचं नातं अतूट आहे. या चित्रपटात तर अस्सल मराठमोळं संगीत आणि पंजाबी ढंगाचं रांगडं संगीत, यांचा खूप उत्तम संगम साकारला आहे. चित्रपटातील गाणी श्रवणीय तर आहेतच, पण ती नकळत ताल धरून नाचायलाही लावतात. नीलेश मोहरीर या गुणी संगीतकाराने खूप उत्तम चाली दिल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वप्निल बांदोडकर, अवधुत गुप्ते, जान्हवी प्रभु अरोरा, कल्पना खान, वैशाली सामंत, कृष्णा बेउरा, जावर दिलावर या सर्वानी ती खूपच मस्त गायली आहेत.
अभिनयाच्या बाबतीत मोठय़ा पडद्यावर पदार्पण करणारे अभिजित खांडकेकर आणि प्रार्थना बेहेरे हे दोघेही मस्त दिसले आहेत. प्रार्थनानं खूपच चांगलं काम केलं आहे. त्वेष, आवेग, राग, प्रेम, अवखळपणा अशा अनेक छटा तिने खूप चांगल्या दाखवल्या आहेत. तर, छोटय़ा पडद्यावर अत्यंत गोंडस प्रतिमा असलेल्या अभिजीतला ‘रांगडा’ म्हणून स्वीकारणं थोडंसं जड जात असलं, तरीही त्याने ते रांगडेपण आपल्या अभिनयाने सिद्ध केलं आहे. त्याने काही लकबी तर अत्यंत मस्तच उचलल्या आहेत. या दोघांशिवाय अभिजितचा पंजाबमधील सहाय्यक झालेल्या हिंमतसिंगची भूमिका करणारा प्रियदर्शन जाधव त्याच्या अभिनयामुळे आणि वेगवेगळ्या हावभावांमुळे चांगलाच लक्षात राहतो. त्याशिवाय पंजाबमध्ये ढाबा चालवणाऱ्या सन्नी सिंगची भूमिका करणाऱ्या वरुण विजनेही मस्त काम केलं आहे. तसेच विक्रम गोखले, शुभांगी लाटकर, पुनीत इस्सार यांनीही आपल्या अभिनयाचा नजराणा पेश केला आहे.

legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Story img Loader