खंडोबा महाराज यांच्यावर आधारीत ‘जय मल्हार’ या मालिकेतील कलाकारांनी येथून जवळच असलेल्या क्षेत्र चंदनपुरी येथे भेट दिली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी केलेल्या या स्वागतामुळे सर्व कलाकार अक्षरश: भारावून गेले. सासुरवाडीला आल्याचा आनंद लाभल्याचे नमूद करतानाच कोणाही जावयाचे एवढे जंगी स्वागत झाले नसेल, अशी भावना मालिकेत खंडेरावाची भूमिका करणारे देवदत्त नागे यांनी व्यक्त केली.
निर्माते व दिग्दर्शक महेश कोठारे, मालिकेत खंडेरायाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाची भूमिका करणारी सुरभि बांडे, बाणाईची भूमिका करणारी इशा केसरकर, प्रधान घाणेकर हे सर्वजण येणार असल्याने ग्रामस्थांनी सडा-रांगोळी व गुढय़ा उभारून स्वागताची तयारी केली होती. कलाकारांचे गावाच्या वेशीवर आगमन झाल्यावर देवदत्त नागे यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्याशी हस्तांदोलन तसेच भ्रमणध्वनिच्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रेत्रकांनी तुफान गर्दी केली होती. ‘जय मल्हार’चा जयघोष करत उपस्थितांनी आसमंत दणाणून सोडला.
मालिकेतील कथानकानुसार सध्या खंडेराय हे जेजुरीचे राज्य पत्नी म्हाळसाला देऊन चंदनपुरीकडे निघाले आहेत. बणाई हिचे चंदनपुरी हे माहेर. योगायोगाने सध्या चंदनपुरीत खंडेरायाची यात्रा सुरू असून त्याच काळात मालिकेतील खंडेराव व अन्य कलाकार येथे दाखल झाल्यानें चंदनपुरीत वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. नागे यांनी खंडेरायांच्या मंदिरात दर्शनही घेतले. यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सासुरवाडीला आल्याचा आनंद लाभल्याचे नमूद करतानाच कोणाही जावयाचे एवढे जंगी स्वागत झाले नसेल, अशी भावना नागे यांनी व्यक्त केली. खंडेरायाच्या कृपाप्रसादाने असे भाग्य आम्हाला लाभल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी केसरकर, हांडे यांनीही भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा