‘अवतार २: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट १६ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतरच अवतार २साठी प्रेक्षक आतूर होते. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रदर्शनानंतर ‘अवतार २’ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
दहापेक्षा अधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या जेम्स कॅमेरून यांची लोकप्रियता साऱ्या जगभर पसरलेली आहे. ‘अवतार २’नंतर प्रेक्षक आता याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच या सीरिजमधील तिसऱ्या भागाबद्दल नवी माहिती समोर आली आहे. ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार जेम्स कॅमेरून यांनी ‘अवतार ३’बद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “ती व्यक्तिरेखा अगदी शाहरुखसारखीच…” ‘डीयर जिंदगी’मधील किंग खानच्या भूमिकेबद्दल गौरी शिंदेचा खुलासा
जेम्स कॅमेरून यांनी एका न्यूझीलंडमधील एका टेलिव्हिजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘अवतार ३’बद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम सुरू असून ते तिसऱ्या चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचं समोर आलं आहे. २०२५ च्या ख्रिसमसदरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याचे जेम्स कॅमेरून यांनी स्पष्ट केले.
अद्याप या तिसऱ्या भागाचे नाव निश्चित झालेले नाही. ‘अवतार २’ हा चित्रपट अवतार चा दुसरा भाग आहे. २००९ मध्ये अवतार प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना तब्बल १३ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. आता ‘अवतार ३’साठी जास्तकाळ लोकांना वाट पाहायला लागणार नाही अशी आशा आहे.