छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ हे महानाटय़ सात वर्षांनंतर नागपुरात सादर होणार आहे. उद्या, मंगळवारपासून या महानाटय़ाला प्रारंभ होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित ‘जाणता राजा’चे आयोजन शिवसूर्य ट्रस्टच्या वतीने रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि कलादिग्दर्शक आनंद जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याची प्रकाश योजना आकर्षक राहणार आहे. याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा महानाटय़ात समावेश राहणार आहे.
अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत.
या महानाटय़ासाठी ७२ फूट लांब, ४० फूट रंद आणि ३० फूट उंच असा रंगमंच उभारण्यात आला आहे. तीनशे बाय साडेतीनशे फुटांचे कंपाऊंड तयार करण्यात आले आहे. या महानाटय़ासाठी बाबासाहेब पुरंदरे १९ नोव्हेंबरला नागपूरला येणार आहेत. आतापर्यंत जाणता राजाचे १२५० प्रयोग सादर झाले आहे. या महानाटय़ात शिवाजी महाराजांची भूमिका डॉ. प्रसन्न परांजपे, जिजाऊंची भूमिका साकारणारी भैरवी पुरंदरे यांच्यासह शिवरायाच्या पत्नीची भूमिका साकारणारी नंदिनी टिपरे, औरंगजेबची भूमिका करणारे राजेंद्र ढुमे या प्रमुख कलावंतांसह तीनशेपेक्षा अधिक कलांवत यात कामे करणार आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महानाटय़ बघता यावे यासाठी देणगी शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे. शालेय विद्याथ्यार्ंना ५० टक्के तर त्यावरील विद्याथ्यार्ंना २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या महानाटय़ाच्या मिळकतीतून येणारा निधी समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पासाठी आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी कार्यरत अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. देणगी प्रवेशिका बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध शाखांमधून व रेशीमबागला कार्यक्रमस्थळी मिळतील. पहिले तीन दिवस सरसकट १० टक्के सवलत दिली जाणार आहे. पत्रकार परिषदेला अभिषेक जाधव, विजय पवार उपस्थित होते.
‘जाणता राजा’ महानाटय़ आजपासून
बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ हे महानाटय़ सात वर्षांनंतर सादर होणार आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
आणखी वाचा
First published on: 17-11-2015 at 10:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janata raja drama will start from today in nagpur