दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘लाइगर’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माइक टायसनही या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाध करत असून आता विजय देवरकोंडानं याच दिग्दर्शकासोबत नवा चित्रपट साइन केल्याची माहिती मिळत आहे.
‘टॉलीवूड फिल्म सर्कल’च्या रिपोर्टनुसार पुरी जगन्नाध आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सारा अली खाननं विजय देवरकोंडासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण विजयच्या आगामी चित्रपटात मात्र साराला संधी मिळालेली नाही. पुरी जगन्नाध यांनी त्याच्या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला साइन करायचं ठरवल्याची चर्चा आहे.
दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या ‘लाइगर’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात व्यग्र आहेत. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करतील. पण आता या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत जान्हवी कपूर दिसणार असल्यानं साराची विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा कधी पूर्ण होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
दरम्यान विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लाइगर’ हा चित्रट एमएमए फायटिंगवर आधारित आहे. या चित्रपटासाठी विजय देवरकोंडा खास प्रशिक्षण घेतलं आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि टायसन यांच्या व्यतिरिक्त रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि रोनित रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं बजेट १५० कोटी असल्याचं बोललं जात आहे.