बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर दोन वेगवेगळे गट पडलेले दिसून येत आहेत. एकीकडे काही यूजर्स रणवीर सिंगला ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे काहीजण त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनीही रणवीरला पाठिंबा दिला असून यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतीच रणवीर सिंगच्या फोटोशूटवर तिची प्रतिक्रिया दिली आणि त्याला पाठिंबा दिला.
जान्हवी कपूरला नुकतंच एका कार्यक्रमात रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर उत्तर देताना जान्हवी म्हणाली, ‘मला वाटतं हे एक कलात्मक स्वातंत्र्य आहे आणि कोणालाही त्यांच्या कलात्मक स्वातंत्र्याची शिक्षा मिळावी असं मला अजिबात वाटत नाही.’ जान्हवीच्या आधीही बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी रणवीरला त्याच्या या फोटोशूटसाठी पाठिंबा दिला आहे.
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर नुकताच तिचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला आहे. याशिवाय आगामी काळात जान्हवी वरुण धवनसोबत ‘बावल’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.
आणखी वाचा-“आवडत नसेल तर डोळे बंद करा” रणवीरच्या न्यूड फोटोशूटबद्दल प्रश्न विचारताच विद्या बालन संतापली
रणवीर सिंगला त्याच्या या फोटोशूटमुळे झालेल्या टीकेनंतर अनेकांचा पाठिंबा मिळाला आहे. अभिनेत्री विद्या बालनने अलीकडेच यावर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “ज्यांनी रणवीरवर खटला दाखल केला त्यांच्याकडे कदाचित काम नसेल, म्हणून ते आपला वेळ यावर वाया घालवत आहेत. तुम्हाला हे फोटोशूट आवडत नसल्यास, तुम्ही पाहू नका किंवा त्याबद्दल वाचू नका. पण गुन्हा दाखल करून एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. दरम्यान विद्या बालन व्यतिरिक्त आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, मिलिंद सोमण, सुमोना चक्रवर्ती अशा अनेक स्टार्सनी रणवीरला पाठिंबा दिला आहे.