अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रुल’ ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला होता. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक नवे विक्रम करत आहे. मात्र, या सिनेमामुळे आता एक नवा वाद तयार झाला आहे. ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाने भारतातील सर्व IMAX स्क्रीन बुक केल्यामुळे ख्रिस्तोफर नोलनचा ‘इंटरस्टेलर’ हा सिनेमा भारतात पुनःप्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाच्या पुनःप्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक हॉलीवूड चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘इंटरस्टेलर’च्या समर्थनार्थ काही पोस्ट फिरू लागल्या; तर काही चाहते ‘पुष्पा २’ची बाजू घेऊन पोस्ट करू लागले. आता या वादात बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने उडी घेतली असून, तिने एका पोस्टवर ‘पुष्पा २’ सिनेमाच्या बाजूने कमेंट केली आहे.
‘पुष्पा २’ देखील सिनेमा आहे
‘तत्त्व इंडिया’ने ‘इंडिया डझंट डिझर्व सिनेमा’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला होता. या लेखात म्हटले होते की ‘इंटरस्टेलर’ भारतात प्रदर्शित होणार नाही आणि त्याऐवजी ‘पुष्पा २’ने सर्व IMAX स्क्रीन बुक केल्या आहेत. जान्हवीने त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर टिप्पणी करीत ‘पुष्पा २’चे समर्थन केले आणि भारतीय सिनेमाला कमी लेखण्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. ती म्हणाली, ” ‘पुष्पा २’देखील सिनेमा आहे. आपण भारतीय गोष्टींना कमी लेखून नेहमीच पाश्चिमात्य गोष्टींना का मोठं करतो? आपल्या देशातल्या गोष्टींना कमी दर्जाचं ठरवणं योग्य आहे का?”
जान्हवीने त्याबरोबरच इतर देश ज्या प्रकारे आपल्या भारतीय मुळांशी जोडलेल्या कथा आणि भव्य सादरीकरणाला सन्मान देतात, त्यावर वक्तव्य केले. ती म्हणाली, “ज्या गोष्टींसाठी जग आपलं कौतुक करते, त्याच गोष्टींबद्दल आपल्याला लाज वाटते. हे खूप दुःखद आहे.”
हेही वाचा…घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई
जान्हवीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही जण जान्हवीच्या मताशी सहमत होते; तर काहींनी त्यांच्याशी असहमती दर्शवली. एका युजरने लिहिले, “हो, सध्या असेच घडत आहे. जे लोक पश्चिमेकडील (पश्चिम देशातील) सिनेमे पाहतात, ते स्वत:ला उच्चभ्रू समजतात आणि बॉलीवूड किंवा भारतीय सिनेमांना कमी लेखतात.” तर दुसऱ्या एका युजरने जान्हवीच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हटले, ” ‘पुष्पा २’चे व्हिज्युअल्स एकदा पाहा, आपण खरंच या प्रकारच्या सिनेमाचा अभिमान बाळगावा का, हा प्रश्न आहे. कृपया याकडे ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’च्या दृष्टिकोनातून पाहू नका.”
हेही वाचा…आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
जान्हवी कपूर काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘देवरा पार्ट १’ या सिनेमात दिसली होती. ती सध्या वरुण धवनबरोबर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.