रवींद्र पाथरे

माणसाची उच्च-नीचता, त्याची जडणघडण त्याच्या जन्मावर ठरत नाही, तर त्याच्या कर्मावर ती ठरते. त्यात परिस्थितीदेखील त्याच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असते.  प्राप्त परिस्थितीचा सामना करून तिला पुरून उरणं किंवा तिला सरळ शरण जाणं हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं.. वेगवेगळं ठरतं. त्यामुळे एकाच परिस्थितीला दोन भिन्न व्यक्ती कशा प्रकारे सामोऱ्या जातील हे निश्चितपणे सांगता येणं अशक्य. पण काही वेळा वेगवेगळ्या काळांत समान परिस्थितीत दोन भिन्न व्यक्ती समांतर प्रवासात कसकशा घडत वा बिघडत जातात याचा धांडोळा घेणं आश्चर्यकारक ठरू शकतं. ‘जन्मवारी’ या हर्षदा बोरकर लिखित-दिग्दर्शित नाटकात हा शोध घेतला गेला आहे. आणि त्यातून हे नाटकदेखील उलगडत जातं.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

प्रसंग १..

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोचता पोचता रात्रीची शेवटची गाडी निघून गेलेली. नाइलाजाने वृंदाला आता पहाटेपर्यंत प्लॅटफॉर्मवरच वेळ काढण्यावाचून गत्यंतर नाही. एवढय़ात एक तरुणी तीच शेवटची गाडी पकडण्यासाठी धडपडत आलेली. तिलाही गाडी थोडक्यात चुकलेली.

आता करायचं काय? साहजिकच दोघींमध्ये बोलाचाली सुरू होते. तुझं नाव काय? काय करतेस? घरचे काय करतात? इतक्या रात्री कुठे चाललेलीस? वगैरे वगैरे.

कट् टू..

एका संस्थानिकांचा दरबार.  राजगणिका शामा नृत्य-गायन करते आहे. दरबारीजन तिच्या कलेवर फिदा आहेत. दस्तुरखुद्द महाराजांचीही तिच्यावर मर्जी आहेच. परंतु तिचं सौंदर्य आता वयानुरूप उतरत चाललंय. तर तिची मुलगी कान्होपात्रा आता वयात आलीय. तिला ऐषोरामात लोळणारा धनी मिळवून देऊन आपल्या पश्चात तिलाही एक श्रेष्ठ गणिका बनवण्याचा शामाचा मानस आहे. त्यादृष्टीनं ती तिची दासी विठाच्या मार्फत कान्हावर नाचगाण्याचे संस्कारही करते आहे.

 विठा ही विठ्ठलाची परमभक्त. कान्हाही लहानपणापासून श्रीकृष्णाच्या अपार भक्तीत बुडून गेलेली. तिला श्रीहरीत आपला सहोदर दिसतो. त्याच्या भक्ती-संकीर्तनात आपला सगळा जन्म घालवायचा असं तिच्या मनानं घेतलेलं. आई शामाने आजवर तिचं हे श्रीहरीभक्तीचं खूळ खपवून घेतलं असलं तरी आता तिला त्यातून बाहेर काढायलाच पाहिजे आणि आपला गणिकेचा जन्मोजन्मीचा धर्म निभावायला तिला तयार करायला हवं, हे शामाच्या लक्षात येतं. ‘कान्हाचा बालहट्ट आता पुरे.. तिने गणिकेच्या धंद्यासाठी आपली तयारी करावी,’ असं ती विठाला फर्मान काढते. कान्हावर मुलीवत प्रेम करणाऱ्या विठाला ते मनातून मान्य नसलं तरी मालकीणीचा हुकूम मोडणं तिला शक्य नसतं.

कट् टू..

प्लॅटफॉर्मवरच्या ‘त्या’ मुलीचं नाव ‘मंजू’ (मंजिरी) असल्याचे वृंदाला कळतं. ती वेश्याव्यवसाय करत असते. तिची आईही हाच धंदा एकेकाळी करीत असे. शिक्षण नाही, त्यामुळे जगाची समज नाही. धंद्यात मिळणारे पैसे आणि त्यातून करता येणारी छानछोकी एवढंच मंजूचं जग. घराला कसलं घरपण नाही. भाऊ उनाडक्या करणारे. मंजूच्या पैशांवर मजा मारणारे.

वृंदाही एकेकाळची गरीब घरातली. मुस्लीम. पण वडलांनी खाणारं एक तोंड कमी व्हावं म्हणून अनाथाश्रमात आणून सोडलेली. तिथंच ती लहानाची मोठी झाली. तिथंच ‘वंृदा’ हे नवं नावही मिळालं. आश्रमात झाडलोट करण्याचं काम करणारी. आश्रमाबद्दल आणि आपल्या कामावर कमालीचं प्रेम असलेली.

बोलण्या बोलण्यात वृंदा मंजूला तिला तिच्या कामात आनंद मिळतो का, म्हणून विचारते. सुरुवातीला तरी मंजू आपण मस्त मजेत असल्याचं तिला सांगते. उलट, ती वृंदालाच विचारते, ‘तुला तुझ्या झाडलोट आणि स्वच्छतेच्या कामात आनंद मिळतो का?’ वृंदा तिला आपण आपखुशीनंच हे काम करत असल्याचं सांगते.

कट् टू..

कान्हा एकदा पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वारी पाहते आणि त्यांच्या अपार भक्तिभावानं हर्षोल्हसित होते. आपणही वारीला जाऊ या का, असं ती विठाला विचारते. ‘आईला आधी विचार..’ म्हणून विठा तिला सांगते. लेकीला गणिकेच्या धंद्यासाठी राजी करायला म्हणून शामा तिला पंढरीला जायची परवानगी देते.

वारीत विठुनामात सर्वस्व हरवून बसलेली कान्हा मग घरी परततच नाही. ती पंढरीतच रमते. भजन-कीर्तनात दंग होते. अभंग रचू लागते. भाविक तिच्या भजनी लागतात. हळूहळू ती संतपदाला पोहचते. तिला जबरीनं गणिका बनवण्यासाठी न्यायला आलेल्या दरबारी सैनिकांची ती कळवळून मनधरणी करते. एक डाव विठुरायाचं मला दर्शन घेऊ द्या, मग मी येते, म्हणून विनवते. शेवटी त्यांना पाझर फुटून विठुरायाचं दर्शन घ्यायला ते तिला परवानगी देतात..

कट् टू..

संभाषण करता करता वृंदाचं समाजसेवेप्रती समर्पित आयुष्य मंजूला कळतं. आपल्यालाही असं आयुष्य का जगता येऊ नये, हा प्रश्न तिला पडतो..

दोन वेगवेगळ्या काळांतल्या या मंजू आणि कान्हा!

त्यांची आयुष्यं खरं तर एकाच मार्गानं जाऊ पाहणारी. पण कान्हा विठुभक्तीचा मार्ग पत्करते आणि गणिकेच्या जन्मजन्मांतरीच्या दु:खभोगापासून आपली सुटका करून घेते. संतपदी पोहोचते.

मंजूचं आयुष्यही वृंदाच्या भेटीनं ढवळून निघतं. तिच्या रूपात तिला एका वेगळ्याच जगाचं दर्शन घडतं. मंजूही मग आपल्या आयुष्याचा पुनर्विचार सुरू करते..

लेखिका-दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी वेगवेगळ्या काळांतल्या या चार स्त्रियांच्या समांतर आयुष्याचा पट ‘जन्मवारी’ नाटकात मांडला आहे. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सं. देवबाभळी’ने एक नवी पायवाट निर्माण केलेली आहे. त्या परंपरेतलंच हे नाटक. पौराणिक कथेला आधुनिक संदर्भ देत ‘जन्मवारी’ची केलेली ही मांडणी प्रेक्षकांना आवडायला हरकत नाही. माणसाचं आयुष्य घडवू तसं घडू शकतं हा संदेश ‘जन्मवारी’ देतं. नाटकाची रचना दोन पातळ्यांवर केलेली आहे. समांतरपणे घडणारे वेगवेगळ्या काळांतील घटना-प्रसंग आणि त्यांतून विशिष्ट विचारांचा गुंफलेला तलम धागा. सुरुवातीला जरी प्रेक्षकांना ही गुंतागुंत नीट आकळत नसली तरी यथावकाश ती पचनी पडत जाते आणि एक आगळा नाटय़ानुभव पदरी पडतो. हर्षदा बोरकर या ‘प्रयोगा’त यशस्वी झाल्या आहेत. या नाटकाची मागणी असलेली उत्तम दृक ्-श्राव्य-काव्याची जोडही त्यास लाभली आहे. मराठी रंगभूमी दृश्यात्मकतेत उणी पडते, हा आक्षेप ‘जन्मवारी’नं साफ खोटा ठरवला आहे. याचं सर्व श्रेय तांत्रिक बाजू अप्रतिमरीत्या सांभाळणाऱ्या मंडळींना निश्चितपणे द्यायला हवं. (नेपथ्य- सचिन गावकर, संगीत- मंदार देशपांडे, प्रकाशयोजना- अमोघ फडके, रंगभूषा/ केशभूषा : नेहा जगताप.. यांच्याच बरोबरीनं गीतरचनाकार, गायक, वादकही आले.)

‘जन्मवारी’ हे नाटक कलाकारांच्या चोख निवडीविना इतकं उत्तमरीत्या सादर होतंच ना. या कलाकारांमध्ये तरतमभाव करणं अनुचित ठरेल. सर्वाचीच कामं दृष्ट लागण्यासारखी झाली आहेत. संपदा जोगळेकर-कुळकर्णी (मंजू), कविता जोशी (वृंदा), अमृता मोडक (शामा), शुभांगी भुजबळ (विठा), शर्वरी कुळकर्णी-बोरकर (कान्होपात्रा) यांच्यात उजवं-डावं करणं कठीण.

हा एक आगळा नाटय़ानुभव आहे.. एकदा तरी अनुभवावा असा!