कथाकथनाची शैली, व्हीएफएक्स आणि कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजले. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील देशांतही ‘बाहुबली’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. जपानमध्येही हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. जपानमधल्या प्रेक्षकांनी अमरेंद्र बाहुबलीसाठी असणारं प्रेम अनोख्या प्रकारे व्यक्त केलं आहे.
‘बाहुबली २’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास याच्या ‘अमरेंद्र बाहुबली’च्या रुपातील एक प्रतिकृती जपानमध्ये तयार करण्यात आली. या प्रतिकृतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉक्स ऑफीसवर अत्यंत कमी वेळात १०० कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता.
वाचा : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिराची कथा
‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने जपानमध्ये पंधरा आठवड्यात सुमारे ८ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. व्हीएफएक्सचे तंत्र ही या चित्रपटामागची खरी जादू आहे. ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ हा चित्रपट २०१७ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटीया आणि इतर सहकलाकारांच्या साथीने साकारलेल्या या भव्य चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली.