दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘जेलर’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. दक्षिणेतील राज्यांमध्ये या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. हा पाहण्यासाठी चेन्नई व बंगळुरूमध्ये कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती, इतकी या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान, रजनीकांत यांची इतकी क्रेझ आहे की त्यांचा एक कट्टर चाहता थेट जपानहून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी भारतात आला आहे.
“मी माझ्यासारख्या अनेक फॅन्सबरोबर कासी थिएटर आणि अल्बर्ट थिएटरमध्ये हा चित्रपट पाहणार आहे. माझ्या थलायवाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी वाट बघू शकत नाही,” असं हिदेतोशी नावाच्या जपानी चाहत्याने सांगितलं. तो खास जेलर टी-शर्ट घालून त्याची पत्नी यासुदा सत्सुकीसोबत चेन्नईत चित्रपट पाहायला आला. १९९८ साली आलेला रजनीकांत यांचा मुथू चित्रपट पाहिल्यापासून तो त्यांचा चाहता आहे. तो चित्रपट जपानमध्ये १०० दिवस चालला होता. यानंतर तो अनेकदा चेन्नईला आला. “हुकुम, टायगर का हुकुम,” हा जेलरमधील आवडता संवाद असल्याचं तो म्हणाला.
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
हिदेतोशीने रजनीकांत यांची २ ऑगस्ट रोजी पोस गार्डन येथील निवासस्थानी भेट घेतली. “जेलरच्या ऑडिओ लाँचच्या यशाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि ते हसले. कधीतरी ते जपानला नक्की येतील, असे वचन त्यांनी दिली. मी पहिल्यांदा त्यांना २००२ मध्ये भेटलो होतो. त्यानंतर दशकभरानंतर ‘लिंगा’ रिलीजच्या वेळी मी त्यांची भेट घेतली होती. मी त्या भेटी कधीच विसरू शकत नाही. मला आठवतं की जपानमधील लोक त्यांच्या सर्व चित्रपटांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात कसे साजरे करतात याचे फोटो मी त्यांना दाखवले होते,” असं हिदेतोशीने सांगितलं.
दरम्यान, ‘जेलर’ चित्रपटात मोहन लाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन, तमन्ना, वसंत रवी, नागा बाबू आणि योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील गाणी अनिरुद्धने संगीतबद्ध केली आहेत.