अभिनेता सिद्धार्थ शुक्ला(Sidhart Shukla)ने आपल्या अभिनयाने वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते आजही त्याच्याविषयी बोलताना दिसतात. ‘बालिका वधू’, ‘ब्रोकन बट ब्युटिफुल ३’ व ‘दिल से दिल तक’मध्ये निभावलेल्या भूमिकांनी त्याला प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. आता जस्मिन भसीनने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थच्या निधनांतर तिच्या काय भावना होत्या, यावर वक्तव्य केले आहे.
Sidhart Shukla च्या निधनाविषयी काय म्हणाली जास्मिन भसीन?
‘पिंकविला’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल बोलताना म्हटले आहे की, त्यावेळी मी काश्मीरमध्ये होते. तिथे इंटरनेटची समस्या होती. जेव्हा मी विमानतळावर गेले तेव्हा लोक सिद्धार्थच्या निधनाबद्दल बोलत होते. मी जे ऐकत होते, त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण ज्यावेळी मी मुंबईत आले, मी सुन्न झाले आणि पुढचे काही दिवस मी सुन्न अवस्थेत होते. सिद्धार्थ कायमचा गेला आहे, हे मला स्वीकारताच येत नव्हते. त्याच्या जाण्याने मला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला, इथे काहीच शाश्वत नाही. त्यामुळे जेव्हा वेळ असतो, त्यावेळी एकमेकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. कारण- वेळेचे आपण काहीच सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते; पण आपण पश्चात्ताप करीत राहतो. त्यावेळी ते बोलले असते, गैरसमज दूर केले असते, तर बरे झाले असते या दु:खात आपण राहतो. सिद्धार्थच्या जाण्याने मला धक्का बसला होता, हे सांगताना जस्मिन भावूक झाली होती.
हेही वाचा: पंजाबी विकी कौशल आहे मालवणी पदार्थांचा चाहता! म्हणाला, “बोबींल फ्राय…”
सिद्धार्थ शुक्ला आणि जस्मिन भसीन यांनी ‘दिल से दिल तक’ मालिकेत एकत्र काम केले आहे. त्याबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले आहे की, या मालिकेमध्ये सगळे ज्येष्ठ व अनुभवी कलाकार होते. त्यामुळे मला भीती वाटत असायची. मात्र, सिद्धार्थमुळे ती मालिका मी करू शकले. त्याने मला खूप प्रोत्साहन दिले, अशी आठवण तिने सांगितली आहे. त्याबरोबरच मालिकेशिवायदेखील आम्ही एकमेकांचे खूप जवळचे मित्र होतो. आयुष्यातील तो एक सुंदर काळ होता. मात्र, काही कारणांमुळे आमच्यात गैरसमज निर्माण झाले होते. पण, तो ज्या प्रकारचा होता, विशेषत: स्त्रियांबरोबरच्या त्याच्या वागण्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी कायमच आदर असल्याचे जस्मिनने म्हटले आहे.
मालिकांशिवाय सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस १३’ आणि ‘खतरों के खिलाडी ७’चे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. २ सप्टेंबर २०२१ ला वयाच्या ४० व्या वर्षी त्याचे अचानक निधन झाले होते.