सुखात लोळत असलेला, उपजीविकेसाठी स्वत: उठून काही तरी करायला हवं याचा साधा विचारही करण्याची गरज ज्यांना भासत नाही असा एक मोठा तरुणवर्ग आज आहे. जसा तो उच्चभ्रू गर्भश्रीमंत समाजात आहे तसाच तो ग्रामीण भागात राजकीय सत्तेच्या जोरावर आपापली संस्थानं उभी करणाऱ्यांच्या घरातही अशी सुखासीन पिढी कुठल्याही विचाराविना नांदते आहे. त्यांना वास्तवाचे भान आणून द्यायचे असेल तर ते त्यांच्याच घरात, मनात शिरून त्यांना हलवायला लागेल, राजकारण्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या विचारधारेला आव्हान देत नवीन विचारधारा उभी व्हायला हवी, असा आग्रह धरत दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ची मांडणी केली आहे. मात्र बाळासाहेबांमध्ये झालेला बदल इतक्या ढोबळ पद्धतीने येतो की तो भाबडा आशावाद ठरण्याची शक्यता जास्त..
बाळासाहेब मारणे (गिरीश कुलकर्णी) हा माजी खासदारांचा मुलगा. ऐन मांडवात वडिलांच्या राजकारणी गणितांमुळे नवरी मुलगी सोडून गेली, लग्न मोडलं याचा धक्का बाळासाहेबाला बसला आहे. मात्र वडिलांच्या सभेला पैसे देऊन जास्तीत जास्त माणसं जमवणं यापलीकडे कुठलंही काम बाळासाहेब करत नाही. त्याला स्वत:चं असं म्हणणं नाही की विचार नाही. वडिलांचा वारसा चालवायचा नाही हे त्याच्या डोक्यात आहे पण ते सोडून काय करणार?, हे त्याला जाणवत नाही. बाळासाहेबाच्या या काही न करण्याच्या वृत्तीने त्याचे वडील अण्णासाहेब मारणे (मोहन जोशी) चिडलेले आहेत, पण बाळासाहेबांची आई (रिमा लागू) सतत त्यांना पाठीशी घालते. बाळासाहेब, त्यांचे आई-वडिलांशी असलेल्या संबंधांमधून केवळ पैशाने आधुनिक झालेली पण त्या आधुनिकतेचा फायदा स्वत:च्या विकासासाठी कसा करून घ्यावा हे न उमगलेली कित्येक लोकं दिसतात. बाळासाहेबांचे जिवलग मित्र जीवन चौधरी आणि विश्वास या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून समाजातील जातीपातीची उतरंड, हुशारी असली तरी पैशाअभावी अडलेली पुढे जायची वाट अशा कित्येक छोटय़ा-छोटय़ा गोष्टी दिग्दर्शकाने सहजपणे मांडल्या आहेत. एका नाटकाच्या निमित्ताने बाळासाहेबांमध्ये होत गेलेला बदल, वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या सुखावर लाथ मारून गावातील लोकांबरोबर एकत्र राहायला आल्यानंतर बाळासाहेबांना कळलेले लोकोंचे खरे जगणे हा त्यांच्या आत्मशोधाचा प्रवास चांगल्या पद्धतीने समोर आला आहे. पण त्यासाठी अनेक गोष्टींचा फापटपसाराही दिग्दर्शकाने वाढवला आहे. त्यामुळे पूर्वार्धात चित्रपटाची कथा पुढेच सरकत नाही. उत्तरार्धात मात्र भरभर गोष्टी घडत जातात.
‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ची कथा ग्रामीण भागातली असली तरी ती परिस्थिती फक्त त्या भागापुरती मर्यादित नाही. ती शहरातही त्याचपद्धतीने पाहायला मिळते. त्यामुळे यात केलेले सामाजिक भाष्यही सर्वानाच लागू पडते मात्र बाळासाहेबांमधील बदलाचा प्रवास फारच भाबडा वाटतो. याशिवाय, चित्रपटाची निर्मिती संगीतकार अजय-अतुलची आहे त्यामुळे त्यांचा दमदार साऊं ड असला तरी सगळीच गाणी कथेच्या ओघात येत नाहीत. विशेषत: ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ हे गाणं उगीचच जोडल्यासारखं वाटतं. तीच गोष्ट ‘मोना डार्लिग’ची.. या गाण्यातून बाळासाहेबांचा वर्कशॉपमधला प्रवास कळतो पण त्याचा परिणाम दाखवण्यासाठी पुन्हा फ्लॅशबॅकचाही आधार घेण्यात आला आहे. मुळात चित्रपट पूर्वार्धात इतका रेंगाळला आहे की गाणी ही त्याच्या वेगात अडथळ्यासारखी वाटतात. बाळासाहेबांच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी चपखल बसले आहेत. त्यांची आणि त्यांच्या आईचे नाते चित्रपटात खूप छान रंगवले आहे. रिमा लागूंनीही आधी मुलाला पाठीशी घालणारी आणि त्याच्यात बदल झालेला पाहिल्यावर नवऱ्याला साथ न देता मुलाला सापडलेली वाट सोडू नकोस हे ठामपणे सांगणारी आई मस्त रंगवली आहे. सई ताम्हणकर आणि भाऊ कदम यांच्याबरोबर बाळासाहेबांच्या मित्रांच्या भूमिकेत असलेले किशोर चौघुले आणि श्रीकांत यादव यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. जाऊंद्या ना.. म्हणून दुर्लक्ष करण्याइतके बाळासाहेब कमी महत्त्वाचे नाहीत मात्र ते याहीपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकले असते!
‘जाऊंद्या ना बाळासाहेब’
निर्माता- पूनम शेंडे, विनय गानू, अजय-अतुल, प्रशांत पेठे, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी
दिग्दर्शक- गिरीश कुलकर्णी
कलाकार- गिरीश कुलकर्णी, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, रिमा लागू, सई ताम्हणकर, मनवा नाईक, भाऊ कदम, किशोर चौघुले, श्रीकांत यादव, अदिती सारंगधर.