‘झुकेगा नहीं’ म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘पुष्पा’ म्हणजेच अल्लू अर्जुन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कोविड काळात या चित्रपटाचा पहिला भाग आला होता ज्याला प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. आता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
अशातच आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. अल्लू अर्जुन लवकरच ‘जवान’ दिग्दर्शक अॅटलीच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ‘जवान’च्या जबरदस्त यशानंतर आता अॅटली त्याचा पुढचा चित्रपट अल्लू अर्जुनबरोबर करणार असल्याची चर्चा आहे. सध्या या चित्रपटाची तयारी जोरदार सुरू आहे. नुकतंच याबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे.
आणखी वाचा : “तो एक संस्कारी…”, प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीबद्दल अरुण गोविल यांचं मोठं वक्तव्य
मीडिया रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनबरोबरच्या या चित्रपटासाठी अॅटलीने चांगलेच मानधन आकरले असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी अॅटली कुमारला या चित्रपटासाठी तब्बल ६० कोटींचे मानधन देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजवर कोणत्याही दिग्दर्शकाला एवढी मोठी रक्कम मानधन म्हणून कधीच दिलेली नव्हती, परंतु अॅटली कुमारच्या आधीच्या चित्रपटांचे कलेक्शन पाहता त्याला एवढी रक्कम देणं योग्य असल्याचंही सांगण्यात येत आहे.
अद्याप याबद्दल कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. जर हे वृत्त खरं असेल तर अॅटली कुमार हा सर्वात महागडा दिग्दर्शक बनू शकतो असं सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुन आणि अॅटली कुमारच्या या चित्रपटाचं प्री-प्रोडक्शनचं काम सुरू आहे. लवकरच अल्लू अर्जुन या चित्रपटाची घोषणा करू शकतो असंही सांगितलं जात आहे. अॅटलीने नुकतंच शाहरुख खानबरोबर ‘जवान’सारखा चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट बघत आहेत.