बॉलीवूडमधील ‘बिग बी’ शहेनशहा अर्थातच अमिताभ बच्चन हे त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांच्यासह ‘बंटी और बबली’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या तिघांवर चित्रित झालेले ‘कजरा रे’ हे गाणेही लोकप्रिय झाले. अमिताभ आणि अभिषेक ही बाप-लेकाची जोडी बऱ्याच चित्रपटांतून पाहायला मिळाली होती. आता जया बच्चन आणि अभिषेक हे प्रत्यक्ष जीवनातील आई व मुलगा दोघेही बॉलीवूडच्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
अमिताभ आणि अभिषेक बच्चन या दोघांनी ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘पा’, ‘सरकारराज’, ‘शूट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘झूम बराबर झूम’, ‘बंटी और बबली’ आणि अन्य काही चित्रपटांतून एकत्र भूमिका केल्या आहेत. मात्र त्या तुलनेत आई जया आणि अभिषेक हे फार कमी चित्रपटांतून एकत्र दिसले आहेत. यापूर्वी गोल्डी बहल यांच्या ‘द्रोणा’ या चित्रपटात जया बच्चन आणि अभिषेक हे आई व मुलगा याच भूमिकेत पाहायला मिळाले होते. ‘द्रोणा’ चित्रपटात जया बच्चन महाराणी जयंती या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या. आगामी ‘हेराफेरी-३’मध्येही जया बच्चन एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
नीरज वोहरा-डकरा दिग्दर्शित ‘हेराफेरी-३’मध्ये जया बच्चन व अभिषेक हे एकत्र काम करणार आहेत. पहिल्यांदा ‘हेराफेरी’, मग ‘फिर हेराफेरी’ आणि आता ‘हेराफेरी-३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आई व मुलगा पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील अन्य भूमिकांमध्ये जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, परेश रावल हे कलाकार आहेत.

Story img Loader