केवळ दाक्षिणात्य नाही तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी आंध्रप्रदेश येथे झाला. त्या केवळ १४ वर्षांच्या असताना त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. शाळेत असताना एका कार्यक्रमात त्यांनी एक नृत्य सादर केलं होतं. हे नृत्य एका दिग्दर्शकाने पाहिले आणि त्यांना एका चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली. जयाप्रदा यांच्या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरगम’ चित्रपटातील ‘डफली वाले.. डफली बजा’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. आजही या गाण्याची जादू कायम आहे. या गाण्याचा एक रंजक किस्सा जयाप्रदा यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये सांगितला.
”सरगम’ चित्रपटात ‘डफली वाले..’ हे गाणं ऐनवेळी घेण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. तिथलं निसर्गसौंदर्य पाहून दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी एक गाणं शूट करून घेऊ असं सहज म्हटलं होतं. तसंच हे गाणं चित्रपटात घेण्याविषयी ते फार उत्सुक नव्हते. अखेरच्या क्षणी आपण गाणं शूट करून घेतलंच आहे तर चित्रपटात त्याचा समावेश करू असं ठरलं आणि नेमकं तेच गाणं तुफान हिट झालं,’ असं जयाप्रदा यांनी सांगितलं.
वाचा : या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा
”डफली वाले..’ हे गाणं त्यावेळी इतकं लोकप्रिय झालं होतं की चित्रपटगृहात प्रेक्षक ते गाणं ‘पॉझ’ करून पुन्हा ‘प्ले’ करण्याची विनंती करायचे. त्या गाण्याच्या वेळी प्रेक्षक पडद्यासमोर येऊन नाचायचे आणि पैशांची उधळण करायचे. अशाप्रकारे फक्त या गाण्याने सुमारे एक कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती,’ असंही त्यांनी सांगितलं.