दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन १’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन २’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा प्रसिद्ध तामिळ अभिनेता जयम रवीने त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे त्याचे जयम रवी हे नाव असणार नाही. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत तो ज्या नावाने प्रसिद्ध आहे ते नाव न लावता तो त्याचे खरे नाव (जन्मनाव) लावणार आहे. आजवर रवी त्याचे जे नाव वापरत होता ते त्याचे टोपणनाव होते.
जयम रवीचे खरे नाव ‘रवी मोहन’ आहे. त्याचे आता असणारे ‘जयम रवी’ हे नाव त्याने २००३ मध्ये त्याच्या पहिला चित्रपट ‘जयम’ च्या यशानंतर ठेवले होते. या चित्रपटामुळे तो तमिळ चित्रपटसृष्टीत एक स्टार झाला . सोमवारी (१३ जानेवारी २०२४) रवीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला.
हेही वाचा…श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
आपल्या घोषणेत, रवीने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत, तो म्हणाला, “चित्रपट नेहमीच माझी सर्वात मोठी आवड राहिली आहे आणि माझ्या करिअरचा पाया रचणारी प्रेरणा ठरली आहे. आज मी माझ्या प्रवासावर विचार करत असताना, मला सिनेमा आणि तुमच्याकडून मिळालेल्या संधी, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल प्रचंड कृतज्ञता वाटते. ज्यांनी मला आयुष्य, प्रेम आणि ध्येय दिले त्या इंडस्ट्रीसाठी मी पुढेही माझा पाठिंबा कायम ठेवेन.”
जयम रवीने स्पष्ट केले की आता त्याला ‘रवी’ किंवा ‘रवी मोहन’ या नावाने संबोधावे. याबद्दल तो म्हणाला, “हे नाव माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आकांक्षांशी सखोल नातं सांगतं. माझ्या ओळखीला माझ्या दृष्टिकोनाशी आणि मूल्यांशी जोडत, आयुष्याच्या नव्या पर्वात, सर्वांनी मला या नावाने संबोधावे अशी माझी नम्र विनंती आहे.”
यासह, रवीने आपल्या स्वतःच्या निर्मिती संस्थेची घोषणा केली, जी ‘रवि मोहन स्टुडिओज’ या नावाने ओळखली जाईल. या स्टुडिओबद्दल बोलताना त्याने सांगितले, “ही निर्मिती संस्था प्रेरणादायी, मनमोहक आणि प्रेक्षकांना जोडणाऱ्या कथांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असेल.” या नव्या ब्रँडिंग अंतर्गत, ‘जयम रवि फॅन क्लब्स’ आता ‘रवि मोहन फॅन्स फाउंडेशन’मध्ये रूपांतरित होईल. ही संस्था गरजू लोकांना मदत करण्यासाठी कार्यरत असेल.
२०२४ मध्ये, रवीने पत्नी आरतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली, २००९ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आरतीने यापूर्वीच रवीने जाहीरपणे केलेल्या या विधानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.
हेही वाचा…तब्बल १४ फ्लॉप चित्रपट देऊनही जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
कामाच्या आघाडीवर, रवी यावर्षी ‘सायरन’ आणि ‘ब्रदर’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. त्याचा पुढील चित्रपट ‘कधालिका नेरामिल्लई’ १४ जानेवारी रोजी पोंगलच्या सणाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.