दिग्दर्शक मणी रत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारलेला आहे. या कादंबरीची कथा फार मोठी असल्यामुळे हा चित्रपट दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. विशेष म्हणजे मणी रत्नम यांनी या दोन्ही भागांचे चित्रीकरण फक्त १५० दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण केले आहे.
या ऐतिहासिक चित्रपटामध्ये विक्रम, ऐश्वर्या राय-बच्चन, कार्थी, त्रिशा कृष्णन, जयम रवी यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे. ए.आर.रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाद्वारे दक्षिण भारतातील चोला राजघराण्याचा वैभवशाली इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन्समध्ये गुंतलेली आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेता जयम रवीने चित्रपटाबद्दलचा एक गमतीदार किस्सा सांगितला आहे.
पिंकविलाने नुकतीच ‘पोन्नियिन सेल्वन’ टीमच्या सर्व कलाकारांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान जयम रवीने एस. एस. राजामौलींनी या चित्रपटाच्या निर्मितीवर दिलेल्या प्रतिक्रियेचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी जेव्हा राजामौली सरांना भेटलो, तेव्हा आम्ही चित्रपटांविषयी बोलत होतो. गप्पा मारताना मी त्यांना पोन्नियिन सेल्वनच्या दोन्ही भागांचे चित्रीकरण १५० दिवसांमध्ये पूर्ण झाल्याचे सांगितले. ते लगेच जागेवरुन उठले आणि ‘हे सांगून मला घाबरवू नकोस. मला बाहुबलीच्या दोन्ही भागांच्या चित्रीकरणासाठी पाच वर्ष लागली होती’ असे म्हणाले. मी त्यांना जे काही सांगितले होते त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. काही वेळानंतर त्यांनी ‘हे कसं जमलं’ असे मला विचारले होते”
यापूर्वी मणी रत्नम यांनी हा चित्रपट कमल हासनसह बनवण्याचा विचार केला होता. त्यांनी एम जी रामचंद्रन यांना हा विचार बोलूनही दाखवला होता. पण बजेट आणि काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती.