‘सत्य जिथे न्याय तिथे’ यावर तरुण वकील प्रगती राजवाडे हिचा विश्वास आहे. सत्ता आणि पैसा यांच्या जोरावर न्याय मिळवता येऊ शकतो ही गैरसमजूत आहे. सत्य तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास जागवण्याचा प्रयत्न प्रगती या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून करणारी नवी मालिका ‘जयोस्तुते’ स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘जयोस्तुते’ ही मालिका मराठी वाहिनीवर एक नवा विषय घेऊन येत आहे. आत्तापर्यंत गुन्हेगारी विश्वाचा विविध अंगाने माग घेणाऱ्या मालिका मराठी आणि हिंदीत येऊन गेल्या आहेत. मात्र, गुन्हेगारांना शिक्षा आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायालयातील लढाई कशी असते, याचे चित्रण पहिल्यांदाच मराठी मालिकेत दिसणार आहे. ‘जयोस्तुते’ची नायिका प्रगती राजवाडे (प्रिया मराठे) ही महत्वाकांक्षी तरूणी आहे. वकिली पेशा स्वीकारलेली प्रगती शहरातील मोठे वकील सबनीस यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करते आहे. आदर्श विचार, व्यवसायाप्रत निष्ठा असणाऱ्या प्रगतीला एका खटल्याच्या निमित्ताने आपण ज्यांना आदर्श मानतो त्या सबनीसांचे खरे रुप कळते. एका उच्चभ्रू महिलेच्या गाडीखाली पादचारी चिरडला जातो. त्याचा ठपका मात्र त्या महिलेच्या वाहनचालकावर लावला जातो. वाहनचालक गुन्हा कबूलही करतो. मात्र, वाहनचालकाची पत्नी आणि त्याच्या मुलीच्या नजरेत दडलेले सत्य काही वेगळेच असते. हे सत्य शोधून त्या वाहनचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रगतीला खुद्द सबनीसांविरूध्द उभे रहावे लागते.
केवळ सत्य समोर आणण्यासाठी एक रूपया घेऊन वकिली खटला लढवणाऱ्या प्रगतीच्या कथेतून ‘जयोस्तुते’ या मालिकेत अनेकविध विषयांवरचे खटले, न्यायालयीन लढाई प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते बुधवार दररोज रात्री १० वाजता असेल.
‘जयोस्तुते’
‘सत्य जिथे न्याय तिथे’ यावर तरुण वकील प्रगती राजवाडे हिचा विश्वास आहे. सत्ता आणि पैसा यांच्या जोरावर न्याय मिळवता येऊ शकतो ही गैरसमजूत आहे.
आणखी वाचा
First published on: 25-08-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayostute marathi serial on star pravah