सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आणि निराशावादी असतो. किंबहुना, मराठीत ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये..’ अशा प्रकारचे वाक्प्रचार प्रचलित आहेत. मात्र, सत्य आणि असत्याच्या दोन्ही बाजू पडताळून घेऊन न्याय देणाऱ्या या विश्वाची कथा ‘जयोस्तुते’ या नव्या मालिकेद्वारे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
प्रगती राजवाडे या तरूण वकिलाच्या माध्यमातून ‘जयोस्तुते’मध्ये अन्यायाविरूध्द दाद मागणाऱ्या विविध खटल्यांच्या कथा रंगविण्यात येणार आहेत. अन्यायाविरूध्द लढण्याचे बाळकडू प्रगतीला लहानपणापासून मिळाले आहे.
आर्थिक परिस्थितीअभावी कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, अशी इच्छा बाळगणारी प्रगती अशा लोकांचा खटला केवळ एक रूपया शुल्क आकारून लढते. ग्राहक अधिकार, लोकहिताचे मुद्दे अशा नानाविध गोष्टी प्रगतीने लढलेल्या खटल्यांमधून आपल्याला पहायला मिळणार आहेत.
या मालिकेबद्दल बोलताना, स्टार प्रवाह वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील यांनी प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच सकारात्मक विचार देण्याची गरज वाटल्याने ‘जयोस्तुते’ मालिकेची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले. न्याय व्यवस्थेबद्दल सामान्य माणसाच्या मनात एक अनामिक भीती आणि गैरसमजुतींनी घर केले असते. समाजात अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध नसते. या मालिकेतून ते मार्गदर्शन देण्याचा वाहिनीचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘जयोस्तुते’ या मालिकेत प्रिया मराठे हिने प्रगती राजवाडेची भूमिका साकारली असून तिच्याबरोबर गिरीश परदेशी, उमा सरदेशमुख, स्नेहा म्हात्रे, ऋतुराज फडके यांच्या मुख्य भूमिका आहेत. मालिकेची निर्मिती दिग्दर्शक महेश कोठारे यांची असून येत्या २५ ऑगस्टपासून सोमवार ते बुधवार रात्री १० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

Story img Loader