स्टार प्रवाह वाहिनीवर २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेचं शीर्षकगीत नुकतंच स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरुन प्रसिद्ध करण्यात आलं. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, हृषिकेश रानडे या सुप्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय.
‘जग सारे इथे थांबले वाटते… भोवताली तरी चांदणे दाटते…
मर्मबंधातल्या या सरी बरसता… ऊन वाटेतले सावली भासते…
ओघळे थेंब गाली सुखाचा मिटे अंतर लपेटून घेता…तू माझा मीच तुझी सख्या जिवलगा…
ऐल ही तूच अन् पैलही तू सख्या जिवलगा…’ असे सुंदर शब्द या शीर्षकगीताचे आहेत.
"जिवलगा" मालिकेचे हे शीर्षक गीत Lyrical version खास तुमच्यासाठी !#JeevlagaOnStarPravah@moharirnilesh @vaishaliisamant @ambekar_aarya @ranadehrishi @AvdhootWadkar @nileshdahanukar @ajinkyadhapare @swwapniljoshi @AmrutaOfficial @sidchandekar @MadhuraDeshpa10 pic.twitter.com/PJgm6qABri
— Star Pravah (@StarPravah) April 18, 2019
गीतकार श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलं असून निलेश मोहरीरने ते संगीतबद्ध केलंय. अप्रतिम शब्द आणि तितकीच सुंदर चाल या शीर्षकगीताचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
‘जिवलगा’ मालिकेच्या प्रोमोजनी याआधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. या मालिकेच्या शीर्षकगीतालाही भरघोस प्रतिसाद मिळतोय. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती २२ एप्रिलची. या मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झालीय. २२ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित होईल.