करोनाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा हात येत आहे. त्यातच आता फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रेंड्स सीरिजमधील रेचलची भूमिका साकारणारी हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर एनिस्टनने नुकतीच करोनाची दुसरी लस घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली. यावेळी करोना महामारीचा सामना करणाऱ्या जेनिफरने विशेषत: भारताचा उल्लेख केला आहे. कारण भारत करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे.
जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. “लसीकरण पूर्ण झालंय आणि मला खूप छान वाटत आहे. आम्ही खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला करोनाची लस मिळाली आहे. दुर्दैवाने, हे चित्र इतरत्र पाहायला मिळत नाही आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे, की एकाच्या आरोग्याचा सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ज्यांना लस मिळत नाही किंवा मिळणार नाही, ज्यांना आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार नाही, त्यांचा मी विचार करत आहे. या संकटात अडकलेल्यांना मदत करण्याची इच्छा असल्यास कृपया माझं अकाऊंट पाहा” जेनिफरने ‘अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन’ या वेबसाईटची लिंक देखील शेअर केली आहे.
View this post on Instagram
त्याआधी जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजणाऱ्या भारताला मदतीचा हात म्हणून तीन पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. त्यापैकी एका पोस्टमध्ये अमेरिकेअर्सने “भारतासाठी तातडीने मदतीसाठी पैसे उभे केले आहेत”, असा उल्लेख देखील केला होता.
आणखी वाचा : “राधे पाहण्यापेक्षा करोनाने मरणे चांगले”, चित्रपट पाहताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल
जेनिफर सध्या एचबीओ मॅक्सवरील ‘फ्रेंड्स : द रियूनियन’चा स्पेशल एपिसोड शूट करण्यात बिझी आहे. या एपिसोडमध्ये जेनिफर आणि फ्रेंड्स सीरिजचे सहकारी कर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.