अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर बोनी कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. या दु:खातून सावरण्यासाठी ते एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देत असल्याचे दिसले. बोनी कपूर यांच्या आधीच्या पत्नीची मुले अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर हेही आता जान्हवी आणि खुशी याच्यासोबत काही वेळा दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार, या चार भावंडांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप आहे. यामध्ये निर्माते बोनी कपूर हेही आहेत. जान्हवीने नुकत्याच एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली.

या ग्रुपमध्ये मी माझे वेगवेगळ्या फोटोशूटमधले फोटो शेअर करत असते. त्यावर मला पप्पांची प्रतिक्रिया हवी असते. त्यांनी माझ्या लूकला संमती देण्यासाठी मी ते फोटो या ग्रुपवर शेअर करते असेही जान्हवी म्हणाली. तसे न झाल्यास हे कपडे घालण्यासाठीचा आत्मविश्वास माझ्याकडे येत नाही. या ग्रुपचे नाव डॅडीस किड्स असे असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे आपल्या आयुष्यातील लहानातील लहान निर्णयातही ती तिच्या कुटुंबियांचे मत विचारात घेते. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर ही भावंडे एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

धडक या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेली जान्हवी येत्या काळात आणखी काही चित्रपटांत झळकणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. ढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जान्हवी कपूर गुंजन यांची भूमिका साकारत आहे. भारतीय वायूदल आणि त्याच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकून घेण्यासाठी जान्हवी मेहनत घेत आहे. यासाठी तिने काही महिन्यांपूर्वी गुंजन यांची प्रत्यक्ष भेटसुद्धा घेतली होती. यासोबतच तिच्या ‘तख्त’ या चित्रपटाचीही सध्या तयारी सुरु आहे.

Story img Loader