नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित अनेक दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात बाबू नावाचे पात्र साकारलेल्या प्रियांशूने त्याला या चित्रपटात कशी भूमिका मिळाली आणि त्यानंतर आईची प्रतिक्रिया काय होती, याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटात ‘बाबू’चं पात्र प्रियांशू ठाकूरने साकारले आहे. “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, असा डायलॉग मारणारा प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू हा सर्वत्र लोकप्रिय ठरला आहे. नुकतंच ‘बीबीसी मराठी’ने प्रियांशूची एक मुलाखत घेतली. यावेळी त्याला झुंडच्या आधीचं आयुष्य आणि झुंड प्रदर्शित झाल्यानंतरचं आयुष्य कसे होते असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच या चित्रपटात निवड कशी झाली, याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
झुंड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माझे आयुष्य फार वेगळे होते आणि तो प्रदर्शित झाल्यानंतर माझ्या आयुष्यात फार फरक पडला. अनेक लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखव अशीही विनंती करत आहे, असे त्याने सांगितले.
मी याआधी केवळ मजा मस्ती करायचा विचार करायचो. नागपुरात असतानाही तेच सुरु असायचे. पण आता मला वाटतं की मी कोणी मोठा माणूस झालो नाही तर मला चालेल. पण मला नागराज सरांसारखा एक साधा माणूस नक्की बनायला आवडेल, असे त्याने म्हटले.
चित्रपटात निवड झाल्यानंतर काय वाटत होते याबद्दल विचारले असता तो म्हणाली, “या चित्रपटात जेव्हा माझी निवड झाले हे अंकुशने सांगितले. त्यावेळी अंकुश माझ्या घरी आला. तो माझ्या आईशी चित्रपटाबद्दल बोलत होता. त्यावेळी माझ्या आईला खरं वाटत नव्हतं. त्यावेळी तिने अंकुशला बाबू इथे नाही असे सांगितले. यानंतर मी आईला सांगितलं की चित्रपटासाठी ऑडिशन दिले आहे आणि माझी निवड झाली आहे. त्यावेळी आईला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. ती मला म्हणाला, अरे तुझी चित्रपटासाठी निवड कशी काय होऊ शकते? यावर मला विश्वास नाही. आता अनेक टोळ्या सक्रीय आहेत ज्या मुंबईत नेऊन किडनी वैगरे विकतात. तिला वाटणारी भीती आणि तिचे शब्द आजपर्यंत माझ्या मनात आहेत. आईने मला ही भीती घातल्यानंतर मला क्षणार्धात असं वाटलं की, खरंच असं झालं तर…?”
“यानंतर आम्हाला पुण्यात शूटींग होणार आहे असं समजले. त्यावेळीही माझ्या मनात धाकधूक सुरु होती. जर पुण्यात नेऊन माझी किडनी काढून घेतली तर…? यामुळे मी तीन-चार मित्रांना माझ्यासोबत चला असे म्हणालो. पण नंतर विचार केला की माझ्या किडनीसोबत यांचीही किडनी काढतील”, असा किस्सा त्याने सांगितला.