बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा नागपूर येथील क्रिडा शिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण हे नागपूरमध्ये झालं आहे. चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या टीमनं प्रमोशनसाठी ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांशू क्षत्रिय म्हणजेच चित्रपटात ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या कलाकारानं अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला.
‘झुंड’ चित्रपटाच्या सेटवरील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्सा शेअर करताना प्रियांशू म्हणाला, ‘मी त्यावेळी रस्त्यावर बसून चहा बिस्किट खात होतो. त्यावेळी सर तिथे आले आणि त्यांनी मला विचारलं काय चाललंय? तर मी त्यांना म्हटलं काही नाही सर चहा- बिस्किट खातोय. तुम्ही खाणार का? तर ते म्हणाले नाही नाही तू खा. मग मी त्यांना म्हटलं, ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे मी आलोच.’ प्रियांशूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’साठी अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार पण…
दरम्यान याच शोच्या मंचावर त्यानं चित्रपटासाठी त्याची निवड कशी झाली हे देखील सांगितलं होतं. तो म्हणाला, ‘नागपुरात रेल्वेच्या ट्रॅकजवळच आमची वस्ती आहे. आमचं लहानपण तिथेच गेलं आहे. त्यावेळी मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि बाकीचे लोकं म्हणजेच माझी टीम ते जमवून विकायचे. त्याचवेळी नागराज मंजुळे यांची एंट्री झाली. मी त्यांना पाहिलं आणि मला वाटलं पोलीस आलेत म्हणून मी सर्वांना पळा असं म्हटलं. पण थोड्यावेळाने त्यांच्या हातात कॅमेरा बघितला, तेव्हा आम्हाला वाटलं की अरे हे न्यूज चॅनलवाले आहेत. पोलीस नाही.’
आणखी वाचा- Video- जेव्हा ६ वर्षांनंतर आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा ‘तो’ सीन केला रिक्रिएट, व्हिडीओ एकदा पाहाच
प्रियांशू पुढे सांगतो, ‘ते शूट वैगरे करत होते. त्यावेळी हळूच त्यांनी कॅमेरा आमच्याकडे वळवला. मी त्यांना विचारले, हे सर्व काय आहे. तर ते म्हणाले, आमचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यावर मी पटकन म्हटलं, ते तुमचं प्रोजेक्ट वैगरे असू दे, पण यात वस्तीचे नाव टाकायचे नाही. यामुळे वस्तीचे नाव खराब होते. वस्ती माझी आहे. असं म्हटल्यानतंर ते हसू लागले आणि यानंतरच त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली.’