रवींद्र पाथरे

सध्या देशात धर्मोन्माद आणि राष्ट्रवादाची अफूची गोळी देऊन जनतेला गुंगवण्याचं काम जोशात सुरू आहे. ‘हम करे सो कायदा’ या नीतीने आपल्या विरोधात मतप्रदर्शन करेल तो देशद्रोही अशी नवीच व्याख्या जन्माला घातली गेली आहे. गोबेल्स तंत्राने लोकांना भूलथापा देऊन फितवलं जात आहे. कुणी काय खावं, काय प्यावं, कुणावर प्रेम करावं याबद्दलचे फतवे काढले जात आहेत. गोहत्येच्या संशयावरून कसलीही शहानिशा न करता झुंडीने एखाद्याचा बळी घेण्याच्या घटना घडत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना विद्यापीठात घुसून बेदम मारहाण करण्यापर्यंत मोकाट गुंडांची मजल गेली आहे. हे सारं होऊनही जनतेच्या मन की बात समजून न घेता आपलीच मन की बात जनतेवर थोपवणं चालू आहे. धर्म व राष्ट्रवादासारख्या माणसाच्या जगण्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या बाबींवरून लोकांच्या भावना भडकावून त्यांचं लक्ष खऱ्या प्रश्नांवरून उडविण्याचा डाव सत्तेतले नेते खेळत आहेत. ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदीसारखा देशाला खाईत लोटणारा अविवेकी निर्णय, शेतकऱ्यांच्या नाडणुकीतून होणाऱ्या आत्महत्या, ठप्प झालेली रोजगारनिर्मिती आणि त्यातून निर्माण झालेली बेकारांची फौज, अल्पसंख्यांचे झुंडबळी यांसारख्या घटनांकडे जनतेने काणाडोळा करावा अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठीच लोकांच्या भावना भडकवणाऱ्या गोष्टी हेतुत: केल्या जात आहे. दुसरीकडे सुदृढ लोकशाहीचं नाटक मात्र मुखवटे वापरून लीलया खेळलं जात आहे. धर्मोन्मादाची गोळी चढवलेल्या लोकांना व भक्तांना कायम नशेत ठेवण्याचं कारस्थान सतत रचलं जात आहे. आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना समाजमाध्यमांतील भाडोत्री गुंड टोळ्यांकरवी लक्ष्य करून नामोहरम करण्याचं षडयंत्र राबवलं जात आहे. अशांच्या मागे ईडी, पोलीस, सीबीआय आदी यंत्रणांना लावून त्यांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जारी आहेत. प्रसार माध्यमांवर दबाव आणून, कधी त्यांना वश करून त्यांचा आवाज क्षीण केला जात आहे. एकुणात सर्वत्र कानठळ्या बसवणारी शांतता राहील याचा चोख बंदोबस्त करण्यात येत आहे.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

अर्थात अशा अस्वस्थ वातावरणातही विरोधाचे काही आवाज उठत आहेत. गुंगीतल्या समाजाला गदागदा हलवून जागे करण्याचे यत्नही होत आहेत. अशांना बळ मिळण्याची नितांत गरज आहे. विवेकी विचारीजन आणि सर्जनशील कलावंतांवर ही जबाबदारी येऊन पडली आहे. परंतु यातल्या काहींनी स्वार्थ वा भीतीपायी तोंडात गुळणी घेतली आहे, तर स्वल्पांनी याविरोधात रणशिंगही फुंकलेले दिसते.

तर सद्य:स्थिती आहे ही अशी आहे!

या पार्श्वभूमीवर समर खडसलिखित व प्रदीप मुळ्ये दिग्दर्शित ‘झुंड’ हे नाटक मंचित होणं, हे एक घटित आहे. या नाटकाच्या नाटय़मूल्यांची चिकित्सा करण्यापूर्वी हे मान्य करायला हरकत नाही. आजच्या अदृश्य भीती व दडपशाहीच्या वातावरणात वर्तमानाची चिकित्सा करणारं असं नाटक येणं ही काळाची निकड आहे. आपल्याकडे आत्ता आत्तापर्यंत पत्रकारिता हा पवित्र पेशा मानला जात असे. परंतु गेल्या काही वर्षांत लोकांचा त्याबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. माध्यमांतही कुप्रवृत्ती बोकाळल्या आहेत. सत्ताधीशांचं लांगुलचालन, पत्रकारितेचा स्वार्थासाठी वापर, राजकारण्यांच्या दावणीला स्वत:ला बांधून घेण्याची वाढती प्रवृत्ती यामुळे पत्रकारितेवरचा लोकांचा विश्वास ढळू लागला आहे. स्वतंत्र बाण्याची पत्रकारिता लोप पावत चालली आहे. याचं प्रतिबिंब दाखवणारं नाटक वा अन्य कलाकृती एव्हाना जन्माला यायला हव्या होत्या. परंतु अजून तरी असं घडलेलं नाही. त्याची कारणं अनेक असू शकतात. त्या खोलात इथे जायचं कारण नाही. मात्र, ‘झुंड’च्या निमित्तानं पत्रकारितेतलं वास्तव काही अंशी का होईना, लोकांसमोर येत आहे. वर्तमानपत्रांत कशा तऱ्हेनं काम चालतं, संपादकीय प्रक्रिया, बातम्यांचं नियोजन वगैरे गोष्टी जरी ‘झुंड’मधून पूर्णाशानं कळत नसल्या तरी आज प्रसार माध्यमांत कोणकोणते दबावगट कार्यरत असतात आणि त्याचं वर्तमानपत्रात कसं प्रतिबिंब उमटतं याचं काहीएक दर्शन नक्कीच या नाटकात घडतं. समर खडस या डाव्या, पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकारानं हे नाटक लिहिलं असल्याने त्यांचं वास्तवाचं आकलन त्या दृष्टिकोनातून असणार, हे स्पष्टच आहे. संपादकीय बैठकीत कुठल्या घटना-घडामोडींना आपल्या वर्तमानपत्रात किती व कसं स्थान द्यायचं याची आखणी केली जाते. अर्थात त्यात वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाचं धोरणही गृहीत असतं. (यास काही वृत्तपत्रं अपवाद आहेत.) त्यानुरूप त्या वृत्तपत्राचं धोरण ठरतं. वृत्तपत्रात संपादकीय विभागात काम करणारी माणसं ही विविध विचारसरणींची, स्वभाव व वृत्ती-प्रवृत्तीची असतात. त्यांचे त्यांचे अजेंडे बऱ्याचदा ते लेखनातून व अन्य गोष्टींतून छुप्या पद्धतीनं राबवीत असतात. या गोष्टी वाचकांना सहसा माहीत नसतात.

तर.. ‘झुंड’मध्ये एका वृत्तपत्र कार्यालयात कॉन्फरन्स रूममध्ये  संपादक मंदबुद्धे संपादकीय बैठक घेत असतात. एकीकडे टीव्हीच्या बातम्या पाहता पाहता ते मोबाइलमध्येही मग्न असतात. आखाती देशातील संघर्षांमुळे भारतीय शेअर बाजार कोसळल्याच्या घटनेवर अग्रलेख लिहिण्याची जबाबदारी ते तुमानेंवर सोपवतात व मोकळे होतात. त्याचवेळी झारखंडमध्ये झुंडबळीची घटना घडलेली असते. परंतु त्यावर साइड नोट लिहावी असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये निघून जातात. तुमाने, ठसन, दशावतारे, बावनकुळे या संपादकीय विभागातील मंडळींचं झुंडबळीवरच अग्रलेख लिहायला हवा असं मत असतं. परंतु संपादकांच्या मनमर्जीपुढे कुणाचं काही चालत नाही. मंदबुद्धेंचे चमचे असलेले अष्टकोने मात्र त्यांची बाजू लावून धरतात. संपादकीय सहकाऱ्यांच्या मतांना केराची टोपली दाखवून मंदबुद्धे बैठक संपवतात.

याच विषयावर नंतर कॅण्टिनमध्ये अष्टकोने वगळता इतर जण आपला संताप व्यक्त करतात. मंदबुद्धे आणि अष्टकोनेंची खिल्ली उडवतात. त्यांच्या मतिमंदतेबद्दलचे किस्से चघळले जातात. प्रत्येक जण आपलं वैफल्य बोलून दाखवतो. तावातावाने चर्चा झडते.

अशात एके दिवशी कॅण्टिनमध्ये कुणीतरी मांसाहार करून त्याची हाडं डस्टबिनमध्ये टाकल्याची घटना घडते. मॅनेजमेंट या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दोषी व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याची नोटीस काढते. ऑफिसात शाकाहार अनिवार्य असताना कुणीतरी मुद्दामहून हे औद्धत्य केलेलं असतं. ठसनने हे केलं असावं असा संशय घेतला जातो. चौकशीची कारवाई सुरू होते. ठसन आपणच हे केलंय याचा पुरावा मागतो. तो अर्थातच नसतो. तरीही ठसननेच हे केलं असावं आणि त्यातही त्याने बीफ खाल्लं असावं असा आरोप त्याच्यावर ठेवला जातो. ठसन शाकाहार व मांसाहारासंबंधीचे वेद-पुराणं-रामायण-महाभारत काळातले मांसाहाराचे दाखले चौकशी समितीच्या तोंडावर फेकतो. तो मुस्लीम असल्याने आणि संपादकांना डोईजड वाटत असल्याने त्याच्याविरुद्ध ही कारवाई केली जात असल्याचा सर्वाना संशय असतो. परंतु हे सिद्ध करता येण्यासारखं नसतं. खरं तर ठसनने त्या दिवशी डब्यात वांग्याचं भरीत आणलेलं असतं. पण चौकशी समिती ते मान्य करत नाही. तेव्हा ‘तुम्ही आधीच निर्णय घेतलेला असेल तर हा चौकशीचा फार्स कशासाठी?’ असा सवाल तो करतो आणि सरळ राजीनामा देऊन निघून जातो.

ठसनच्या मागे आपण ठामपणे उभे राहिलो नाही, एक प्रकारे त्याच्या (राजीनामा देण्याच्या) हत्येत आपणही मूक साक्षीदार बनलो याची तीव्र बोच ठसनच्या सहकाऱ्यांना लागते आणि ते एकजूट होऊन लढायचं ठरवतात..

लेखक समर खडस यांनी देशातील सद्य:स्थितीवर भाष्य करण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची निवड हेतुत:च केली असावी. कारण ज्या स्तंभाच्या खांद्यावर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे ती माध्यमंच जर अन्याय्य गोष्टीला बळी पडत असतील तर आशा कुणाकडून ठेवायची, हा प्रश्न त्यांना पडला आहे. ‘झुंड’मध्ये समर खडस यांनी याला वाचा फोडली आहे. यानिमित्ताने पत्रकारितेतील अवनतीकडेही त्यांनी निर्देश केला आहे. तथापि संपूर्ण पहिला अंक त्यांनी संपादक मंदबुद्धेंची खिल्ली उडविण्यात प्रस्तावनेदाखल खर्ची केला आहे. चर्चानाटय़ म्हणजे नुसत्या उखाळ्यापाखाळ्या नव्हेत. त्यात नाटकाचा अंगभूत विकासही (ग्रोथ) अपेक्षित असतो. याकडे खडस यांचं दुर्लक्ष झालं आहे. दुसऱ्या अंकात मात्र ते मूळ मुद्दय़ाला भिडले आहेत. हा अंक अत्यंत वेगवान आणि विषयानुरूप उत्कर्षबिंदूप्रत जातो. लेखकानं आजच्या ज्वलंत प्रश्नाला नाटकात हात घातला आहे. त्यासंबंधीची त्यांची साधार मांडणी अंतर्मुख व विचारप्रवृत्त करणारी आहे. मात्र, हे करताना प्राचीन व अर्वाचीन ग्रंथांतल्या दाखल्यांचा जो भडिमार त्यांनी केला आहे, तो योग्यच असला तरी त्यात सतत लेखक डोकावत राहतो. आपल्या कलाकृतीतून आपल्याला हवं ते मांडण्याचा लेखकाला अधिकार असला तरीही तो स्वत:च त्यात डोकावत राहणं खचितच उचित नव्हे. खरं तर नाटकात व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीवर व सद्य:परिस्थितीवर लेखकाला भाष्य करायचंय. परंतु हे करताना ते व्यक्तीमध्येच अधिक गुंतले आहेत की काय असं वाटत राहतं. नाटकाच्या तटस्थतेला हे मारक आहे. उदा. संपादकांना दिलेलं ‘मंदबुद्धे’ हे नाव. ढोबळपणाचा हा अर्क होय. अशा काही उणिवा जाणवत असल्या तरी  नाटकात सत्याचा जो आग्रह ठसनने धरला आहे, तो नि:संशय योग्यच आहे. त्यासाठीची किंमत प्रसंगी चुकवायची तयारी प्रत्येकानं ठेवायला हवी. अन्यथा सुजाण नागरिक म्हणून आपण कोणत्या तोंडानं पुढच्या पिढय़ांना सामोरे जाणार? हा ठसनचा सवाल अंतर्मुख करणारा आहे.

दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांनी नाटकातील आशय थेटपणे पोहोचविण्याचा प्रयत्न सादरीकरणात केला आहे. पहिल्या अंकातील प्रस्तावनेला मात्र त्यांनी दिग्दर्शकीय कात्री लावायला हवी होती. यातील नमुनेदार पात्रं त्यांनी ठसठशीतपणे आकारली आहेत. मात्र, काहींच्या तोंडून लेखक स्वत:च वदतो आहे, हे त्यांनी लेखकाच्या ध्यानी आणून द्यायला हवं होतं.

राहुल रानडे यांनी संगीतात युद्धप्रसंगीच्या आघाती वाद्यांची केलेली  योजना ढोबळपणात मोडते. संदीप नगरकरांनी रंगभूषेतून पात्रांना ‘चेहरे’ दिले आहेत. नेपथ्यरचनेत संपादकीय बैठकीची कॉन्फरन्स रूम, कॅण्टिन आणि संपादकीय विभाग निरनिराळ्या लेव्हल्सवर उभारल्याने स्थळविभागणी झाली असली तरी त्याने रंगावकाशाचा संकोच झाला आहे. पात्रांच्या वावरण्यावर त्याने मर्यादा आली आहे.

संपादक मंदबुद्धेंच्या भूमिकेत प्रदीप पटवर्धन फिट्ट बसले आहेत. त्यांचं वावरणं, बोलणं व होयबागिरी संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. चमचेगिरीत माहीर अष्टकोने त्यांच्या लाचारीसह श्रीराम गाडगीळांनी मूर्तिमंत उभे केले आहेत. फायरब्रॅण्ड ठसन- अक्षर कोठारी आपली छाप पाडतात. मात्र, त्यांचे प्राचीन-अर्वाचीन दाखले अभ्यासातून व्यक्त होण्याऐवजी लेखकानं दिलेल्या संवादांतून आधिक्याने प्रकटतात. किरण मानेंनी दशावतारेंची तगमग, त्रागा आणि संताप ठाशीवपणे व्यक्त केला आहे. तुमानेंचं संयत व्यक्तिमत्त्व सागर आठलेकर यांनी, तर बावनकुळेंचं परिस्थितीवश बोटचेपेपण सागर पवारांनी नेमकेपणानं पोहोचवलं आहे. पूजा रायबागी यांनी मॅनेजमेंटच्या प्रतिनिधीचा ताठा योग्यरीत्या दर्शविला आहे.

समकालाचा वेध घेणारं, त्यावर ठोसपणे भाष्य करणारं हे नाटक आशयाच्या सच्चेपणासाठी निश्चितच पाहायला हवं.

Story img Loader