|| रेश्मा राईकवार
जे नेहमीच दिसतं पण आपल्या जाणीव नेणिवेत ते उतरत नाही किंबहुना उतरविण्याचा प्रयत्नही आपण करत नाही त्या जगाच्या संवेदनांची अनुभूती चित्रपट माध्यमातून देण्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या प्रत्येक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांनी या मातीतल्या वास्तव गोष्टी अनुभवल्या आहेत. हिंदीत पहिल्यांदाच ‘झुंड’च्या निमित्ताने गोष्ट सांगण्याचा आणि अभिनयाची रूढ चौकट मोडून काढण्याचा यशस्वी प्रयोग नागराज मंजुळे यांनी केला आहे.
आहे रे आणि नाही रे या दोन समाजातला संघर्ष हा पिढय़ान् पिढय़ा सुरू आहे. इंडिया आणि भारत या दोन शब्दांत वसलेली या स्वतंत्र देशातली दोन भिन्न विश्व चित्रपटात पहिल्याच फ्रेमपासून दिग्दर्शक दाखवून देतो. पण इथे ही गोष्ट त्यांच्यातील संघर्षांची नाही. दोघांचेही अस्तित्व मान्य करून त्यांना एकत्र सांधण्याचा प्रयत्न करणारी आहे. या दोघांमध्ये असणाऱ्या एका लांबलचक भिंतीला एक छोटंसं गेट आहे, ते उघडून या दोघांना समजून घेऊ शकणाऱ्या प्राध्यापक विजय बोराडेंसारख्या व्यक्तींनी त्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे अंतर पुसून टाकायच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. दोन्हीकडच्या आर्थिक, सामाजिक जीवनशैलीत फरक असला, विरोधाभास असला तरी कष्ट आणि प्रयत्नांच्या जोरावर दोघांनाही यश साध्य होऊ शकते. फरक इतकाच आहे की एका समाजाला पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याचा हक्कच नाकारला गेला आहे, त्याला आपले अस्तित्व सिध्द करण्यापासूनचा संघर्ष आहे. तर दुसऱ्याला किमान सोयीसुविधा तरी हातात आहेत, आपली वाट शोधण्यापुरत्या ओळखीच्या पाऊलवाटा तरी समोर आहेत. ‘झुंड’च्या कथेतून दिग्दर्शकाने या दोन्ही गोष्टी तितक्याच ताकदीने मांडल्या आहेत. नागपूरस्थित समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या अशा खऱ्या आणि यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी ‘झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम’ या कल्पनेतच विरोधाभास असला तरी हा प्रयोग सत्यात उतरला आहे. आणि या सत्यकथेच्या आधारे नागराज मंजूळे यांनी आपल्याला जे सांगायचं आहे ते प्रभावीपणे ‘झुंड’मधून पोहोचवलं आहे.
एका महाविद्यालयाचं मोठं मैदान, त्याला लागून असलेली भिंत आणि भिंतीपलीकडे झोपडपट्टी. विजय बोराडे नेहमी याच झोपडपट्टीतील मोकळय़ा जागेतून महाविद्यालयात ये-जा करतात. ते समाजसेवक आहेत, घरात प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतात, पण ते हाडाचे क्रीडा प्रशिक्षक आहेत. एरव्ही चोऱ्यामाऱ्या, शिवीगाळ, नशापाणी करण्यात रमलेल्या या झोपडपट्टीतील मुलांचा प्लॅस्टिकच्या डब्याच्या आधारे चाललेला फुटबॉलचा खेळ बोराडेंच्या दृष्टीस पडतो. ही मुलं फुटबॉल उत्तम खेळू शकतात याची जाणीव झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला पैसे देऊन का होईना ते खेळायला भाग पाडतात. या मुलांना फुटबॉल खेळायला शिकवलं, त्यांना स्पर्धामधून खेळायला दिलं तर त्यांच्यासाठी एक रोजगाराची संधी, भविष्य सुधारण्यासाठीची एक वाट निर्माण होईल. ही मुलं वाईट प्रवृत्तीची नाहीत. खेळामुळे त्यांच्यात सुधारणा होते आहे हे लक्षात आल्यानंतर बोराडेंची खटपट सुरू होते. एक चांगलं आयुष्य जगण्याची आस, जिद्द या मुलांमध्येही असते. त्यांची जिद्द बोराडेंना आणखी प्रयत्न करायला भाग पाडते असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. या मुलांचा खेळ, त्यांच्याबरोबर राहून त्यांना समजून घेत त्यांचा खेळ वाढवण्यासाठी बोराडेंनी केलेले प्रयत्न आणि झोपडपट्टीतील मुलं म्हणून आपल्यावर बसलेला समाजाचा ठपका, त्यांचा दृष्टिकोन सहजी बदलणार नाही. त्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहायलाच हवा याची मुलांना झालेली जाणीव या सगळय़ाची गोष्ट म्हणजे ‘झुंड’.
एखादी गोष्ट जर थेट काळजापर्यंत भिडवायची असेल तर हळूहळू त्या गोष्टीतल्या पात्रांबरोबर रमायला हवं, त्यांच्यातलं होऊन त्यांची गोष्ट अनुभवायला हवी. त्यासाठी तितका वेळ घेतलाच पाहिजे, हा दिग्दर्शक म्हणून नागराजचा आग्रह इथेही पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा रेंगाळतो आहे की काय असं भासतं. मात्र एका क्षणी या सगळय़ा पात्रांच्या बारकाव्यांसह आपण त्यात गुंतत गेलो की चित्रपट वेगाने पुढे सरकत जातो. उत्तरार्ध हा त्या तुलनेत खूप साऱ्या घटनांनी भरलेला आहे. शब्दबंबाळ संवाद नाहीत वा अभिनयातून खूप काही व्यक्त व्हायचं आहे हा अभिनिवेशही नाही. इतक्या सहजसुंदर पध्दतीची चित्रपटाची मांडणी आहे. त्या मांडणीत अमिताभ बच्चन यांच्यासह या झुंडीतला प्रत्येक मुलगा खरा उतरला आहे. अमिताभ यांना इतक्या वास्तववादी शैलीत आणि अगदी सर्वसामान्य वाटावेत अशा अजिबात परिचयाच्या नसलेल्या चेहऱ्यांबरोबर काम करताना पाहणं हीच मोठी पर्वणी आहे. अमिताभ यांचा चिरपरिचित खर्जातला आवाज नाही, त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व किंवा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेतून जाणवणारी हुशारी, करारी बाणा नाही. महानायक म्हणून त्यांची जी वैशिष्टय़ं आहेत त्याच्या कुठल्याही खुणा विजय बोराडे पाहताना जाणवत नाहीत. जे दिसतं आहे ते समजून घेत आपल्या परीने त्याचा अर्थ लावत पुढे जाणारा सहृदयी, विवेकी, प्रसंगी जिद्दी असा साधा माणूस त्यांच्या नजरेतून व्यक्त होताना पाहणं अशी संधी केवळ नागराजच देऊ जाणे..
या चित्रपटातील मुलांनी तर प्रसंगी अमिताभ यांच्यावरही कडी केली आहे. खासकरून बोराडेंच्या घरी एकत्र जमलेली मुलं, आजपर्यंत आपल्याला तुला काय वाटतं आहे?, हे कोणी विचारलेलंच नाही. घरी प्रचंड दु:खं आहे, संकटं आहेत. त्यात पिचलेले जीव, आतून आपल्याला काय वाटत आहे हा विचारच त्यांच्या मनात येत नाही. आला क्षण फक्त जगायचा आहे या एकाच ओढीने गेलेल्या आयुष्याविषयी काय सांगायचं? पण निदान आपल्याला कोणी तरी विचारलं हेच खूप आहे हेही सांगण्यासाठी शब्द न सापडणारा बाबू आणि या सगळय़ांसारखंच आपलं आयुष्य आहे हे सरळपणे सांगणारा अंकुश, सोमनाथने साकारलेला इम्रान शेख यांना कलाकार म्हणून वेगळं काढणंच शक्य नाही. या व्यक्तिरेखा ते जणू जगलेत अशा पध्दतीने त्यांच्याकडून काम करून घेणं ही जशी नागराजची खासियत तितकंच या मुलांनीही ते समजून उमजून जिवंत केलं आहे. ‘झुंड’ची गोष्ट त्यांच्यामुळे जिवंत झाली आहे, त्याचं श्रेय त्यांनाही द्यायला हवं. किशोर कदम, छाया कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, गल्लीबोळातून सराईतपणे फिरवणारे, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारे सुधाकर रेड्डी यांचं छायाचित्रण, अजय – अतुल यांच्या संगीताची योग्य जोड चित्रपटाला मिळाली आहे.
खेळ हे माध्यम, पण त्याधारे कितीतरी प्रतीकात्मक गोष्टी जाणवून देण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. दोन विश्वांमध्ये असलेली भिंत सहजी ढासळू शकते, मात्र त्यासाठी एकाने बंद केलेली दारं उघडून त्यापल्याडच्या जगात सामावून जायला हवं आहे. तर दुसऱ्याने आव्हानांची ही भिंत कर्तृत्वाच्या आणि संधीच्या जोरावर ओलांडून उंच भरारी घ्यायची आहे. पडद्यावर अमिताभ बच्चन यांच्यासारखा नावाजलेला, कसलेला चेहरा असला तरी मला माझी जी गोष्ट सांगायची आहे ती मी माझ्याच पद्धतीने मांडणार ही दिग्दर्शकाची ठाम धारणा त्याच्या पटकथेतून, संवादातून, कलाकारांच्या अभिनयातून ठायी ठायी उमटत राहते. एकाअर्थी बॉलीवूडचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि वास्तववादी विषय मांडणी या दोन परस्परविरोधी गोष्टी ‘झुंड’मध्ये एका प्रवाहासारख्या प्रतीत झाल्या आहेत. आपल्या मातीतल्या गोष्टी आणि वैश्विक दर्जा, निर्मितीमूल्य या दोन्हीची सांगड घालत केलेला नागराज पोपटराव मंजुळे कृत ‘झुंड’ हा अनोखा प्रयोगशील चित्रपट आहे.
झुंड, दिग्दर्शक – नागराज मंजुळे
कलाकार – अमिताभ बच्चन, छाया कदम, किशोर कदम, अंकुश गेडाम, प्रियांशू क्षत्रिय, सोमनाथ अवघडे, अॅलन पॅट्रिक, जेरिको रॉबर्ट, सायली पाटील, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर.