वादविवाद आणि हो-नाहीच्या तालावर रखडलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झुंड’चं चित्रीकरण पार पडलं. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झाली असून २० सप्टेंबर २०१९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत होत आहे.
Release date finalised… #Jhund, starring Amitabh Bachchan and directed by #Sairat director Nagraj Manjule, to release on 20 Sept 2019… Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Raaj Hiremath, Savita Raj Hiremath and Nagraj Manjule. pic.twitter.com/iPMaIyT8Z9
— taran adarsh (@taran_adarsh) February 19, 2019
‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग नागपूरमध्ये अखेर सुरळीत पार पडलं.