बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. जियाच्या आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या चार वर्षांपासून आपण कशाप्रकारे न्यायासाठी झगडत आहोत, याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे.
मोदींना लिहिलेल्या या पत्रात पोलिसांवर आरोप करत त्यांनी म्हटले आहे की, ‘ एका पूर्वनियोजित हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात मी न्यायवैद्यक पुरावे सादर करत याचिका दाखल केली होती. ब्रिटीश न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या अहवालानुसार जियाच्या शरीरावर आढळलेल्या जखमांची तपासणी आणि पुराव्यांच्या आधारावर तिच्या मृत्यूला आत्महत्या म्हणता येणार नाही. सीबीआय आणि पोलीस यंत्रणांच्या कामगिरीवर मी संशय घेणं अपमानास्पद असेल. मात्र, त्यांनी काही कारणास्तव योग्य प्रकारे चौकशी केली नाही असं मला वाटतं आणि ही कारणं त्यांनाच ठाऊक असतील. पोलीसच आरोपींना मिळाले असतील तर ते या प्रकरणातील सत्य कसं समोर आणणार, असा सवाल राबिया खान यांनी विचारला आहे.
Emmys 2017: प्रियांकाच्या नावाचा चुकीचा उच्चार; ट्विटरवर चाहत्यांचा राग अनावर
जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र, तो जामिनावर सुटला होता. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. याप्रकरणी सुरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आरोपपत्र सीबीआयनं दाखल केलं. त्यानंतर राबिया यांनी पुन्हा एकदा याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, जिया खान हिने आत्महत्याच केली, अशी भूमिका सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी घेतल्यामुळे त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली होती.