अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोली याची रवानगी १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सूरजने आपल्यावर बलात्कार करून मारहाण केल्याचा आरोप जिया खानने केला होता. जिया व सूरज ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहात असल्याने सूरजवर ‘घरगुती हिंसाचार प्रतिबंधक’ कायद्याखाली गुन्हा दाखल करता येईल का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
जिया खानने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सूरजवर बलात्कार, मारहाण, धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारी जुहू पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजला अटक केली होती. मंगळवारी त्याला अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सूरजवर पत्रात गंभीर आरोप केले असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी केली. तर सूरजचे वकील जमीर खान यांनी ते पत्र जियाने लिहिलेच नसल्याचा दावा केला. सूरजने प्रेमसंबंधांत जियाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. ते पत्र तीन दिवसांनी मिळाले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद अमान्य करत सूरजला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा