मनोरंजनाच्या झगमगाटी दुनिये मागे काही वाईट गोष्टी दडलेल्या आहेत. अनेक चित्रपट तारे-तारकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबून ‘प्रत्येक गोष्ट यश आणि प्रसिध्दी मिळवूनच संपते असे नाही’ हे दाखवून दिले आहे. जिया खानच्या आत्महत्येने या झगमगाटी मनोरंजन नगरीची काळी बाजू उजेडात आणली आहे. रामगोपाल वर्मा च्या ‘शब्द’मध्ये इतर कुणी नाही तर चक्क अमिताभ बच्चन सोबत जियाला काम करण्याची संधी मिळाली. हुशार आणि आकर्षक आभिनेत्री आसा नावलौकिक मिळवलेल्या जियाने आत्महत्या करीपर्यंत तिचे सर्व काही ठिकठाक चालले आहे असाच सर्वांचा समज होता.
अनेक नवोदीत बॉलिवूडमध्ये बरीच स्वप्न घेऊन येतात. आपल्या स्वप्नांना मोठे करण्यासाठी ते धडपडत असतात. परंतू प्रत्येक जण स्टार बनेलच असे नाही. फिल्मी दुनियेत पाय रोवण्यासाठी आधी तुम्हाला नशिबाची साथ असावी लागते व बाकी यश कष्टामधून मिळते आसा या क्षेत्रामध्ये एक समज आहे. अभिनेत्री दिव्या दत्ता म्हणते, “एखादी चांगली भूमिका किंवा ब्रेक मिळण्यासाठी कधी कधी तुम्हाला फक्त नशिबाची साथ असावी लागते. काही नवख्यांना ब्युटी पार्लरमध्ये बसल्या बसल्या चांगल्या भूमिका चालून येतात. तर, काही स्टार मंडळींचे पाहता पाहता सर्व काही संपते. यातूनच उदासिनता वाढते आहे व स्वत:ला संपविण्यापर्यंत निर्णय घेतले जातात.”
चंदेरी दुनियेत आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमध्ये एका गोष्टीचे साम्य आढळते, ते म्हणजे ‘उदासिनता आणि बिघडणारी नाती’  होय. मॉडेल विवेका बाबाजी व नफिसा जोसेफ यांनी देखील वैयक्तीक जिवनामध्ये आणि करियर मधील अपयशामुळे खचून जाऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबला. तिचबाब जिया सोबत देखील घडली. वादळी प्रेम प्रकरण आणि करिअरच्या खाली चाललेल्या आलेखामुळे खचून जाऊन जियाने स्वत:ला संपविले. “चित्रपट सृष्टीमध्ये येणा-या ब-याच तारे-तारकांना नाकारले गेल्यामुळे उदासिनता भेडसावते. या क्षेत्रामध्ये सुरूवातीला यशाच्या शिखरावर असणाऱयांना नंतर येणारे अपयश सहन होत नाही. त्यामधून बरेचजण दारू आणि अमली पदार्थांकडे वळतात. आणि त्यातील काही जिया सारखी टोकाची भूमिका घेतात.” असे मानसशास्त्रीय चिकित्सक सिमा हिंगोराणी म्हणाल्या.
चित्रपटसृष्टीत येणाऱयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घरदार सोडून आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी धेयवेडे तरूण-तरूणी मायानगरीमध्ये दाखल होत आहेत. स्टार होण्याच्या उच्चकोटी अपेक्षांच्या ओझ्याखाली ते आहेत. “या क्षेत्राकडून त्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. जेव्हा चित्रपटसृष्टीत चांगली संधी मिळत नाही तेव्हा अनेकजण नकारात्मकतेकडे व उदासिनतेकडे वळतात.” असे या झगमगाटी दुनियेत तब्बल १५ वर्षे संघर्ष करून ‘पीपली लाईव्ह’मुळे प्रकाश झोतात आलेला नवाझुद्दीन सिद्दिकी म्हणाला.