पहिल्यांदाच विविध भाषांतील १०० नव्या गोष्टी चित्रपट आणि वेब मालिकांतून प्रदर्शित करणार

रसिक प्रेक्षकांचे चित्रपट, वेब मालिकांच्या माध्यमातून मनोरंजन करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या जिओ स्टुडिओज या ओटीटी वाहिनीला पाच वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने जिओ वल्र्ड कन्हवेन्शन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिओ स्टुडिओजने पहिल्यांदाच हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमधील वेगवेगळय़ा धाटणीच्या १०० गोष्टींवरील चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील प्रत्येक भाषा, संस्कृती यांची गोष्ट मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे जिओ स्टुडिओजच्या वतीने सांगण्यात आले. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या नव्या उपक्रमात मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली या भाषांत चित्रपटगृहांमध्ये गाजलेले चित्रपटही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याशिवाय, भारतातील प्रांतीय भाषांना उभारी देण्यासाठी नव्या वेब मालिका प्रदर्शित करण्यात येणार आहेत. चित्रपटसृष्टीचा पाया असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटही जिओ स्टुडिओजच्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित केले जाणार आहेत. यात ‘बाईपण भारी देवा’, ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘फोर ब्लाइंड मेन’, ‘वनटूथ्रीफोर’, ‘खरवस’, ‘काटा किर्र्र’, ‘खाशाबा’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय ‘कालसूत्र’, ‘एका कलेचे मणी’, ‘अगं आई अहो आई’ या मराठीतील नव्या वेब मालिकांचाही समावेश आहे.

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या पोलिसांवर आधारित चित्रपट मालिकांचा आनंद घेतला; पण आता जिओच्या उपक्रमातून बंगाली भाषेत पोलिसांच्या कथांवर आधारित चित्रपट मालिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील शंभर गोष्टी तीन वर्षांच्या कालावधीत चित्रपट आणि वेब मालिकांमधून विविध भाषेत मांडण्यात आल्या आहेत. यात ‘डंकी’, ‘ब्लडी डॅडी’, ‘भेडिया २’, ‘अनटायटल’, ‘स्त्री २’, ‘सेक्शन ८४’, ‘हिसाब बराबर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘ब्लॅकआउट’, ‘मुंबईकर’, ‘द स्टोरीटेलर’, ‘धूम धाम’ या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘लाल बत्ती’, ‘रफूचक्कर’, ‘बजाओ’, ‘द मॅजिक ऑफ शिरी’ अशा काही नव्या वेब मालिकांचाही समावेश आहे. गेली अनेक वर्षे आपल्या भारदस्त आवाजातील भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ओटीटी वाहिनीवर पदार्पण करीत आहेत.

जुन्या भारताची नव्या भारताशी भेट घडविण्याचा उद्देश समोर ठेवून या शंभर गोष्टींचा चित्रपट आणि वेब मालिकेच्या माध्यमातून प्रस्तुती आणि निर्मिती करीत आहोत, असे मनोगत रिलायन्स मीडिया आणि कंटेन्ट बिझनेसच्या अध्यक्ष ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केले, तर सध्याच्या डिजिटल युगात कथानक केंद्रस्थानी ठेवून भारतातील, भारतासाठी आणि भारताकडून आलेल्या कथा प्रेक्षकांसमोर सादर करणे हा आमचा उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.

भारताच्या कानाकोपऱ्यात विविध भाषांमध्ये गोष्टी दडल्या आहेत, त्या या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मराठी भाषेची गोडी, संस्कृती आणि कला देशभरात पोहोचावी हा उद्देश आहे, असे जिओ स्टुडिओजचे मराठी आशय प्रमुख निखिल साने यांनी सांगितले.

भारताची चित्रपटसृष्टी ही मराठी चित्रपटसृष्टीतून उभी राहिली. चित्रपटसृष्टीची ओळख ही मराठी चित्रपटच असली पाहिजे, अशी आम्हा सर्व कलाकारांची इच्छा आहे. –सुबोध भावे, अभिनेते

जिओ स्टुडिओजच्या या उपक्रमात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपट आणि वेब मालिकेने मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन होईल. –केदार शिंदे, दिग्दर्शक

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio studios platform for films in regional languages amy
Show comments