चित्रपटाच्या नावामुळे आणि ‘पोर्नस्टार’ सनी लिऑन हिला पाहण्याच्या उत्सुकतेने चित्रपटगृहात जावे तर फक्त थोडेसे जिस्मदर्शन पाहायला मिळण्याव्यतिरिक्त संपूर्ण चित्रपट पाहणे कंटाळवाणे ठरते.
कबीर (रणदीप हुडा) या अनेकांचा खून पाडलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी आणि त्याच्याजवळची माहिती मिळविण्यासाठी अयान ठाकूर (अरुणोदय सिंग) हा इझना (सनी लिऑन)च्या बरेच दिवस मागावर असतो. तिला भेटून गुप्तहेर संस्थेसाठी काम करण्याचे सांगतो. अयानचा बॉस असलेला गुप्तहेर संस्थेचा प्रमुख म्हणून काम करणारा गुरू (आरिफ झकेरिया) इझनाला भेटून कबीरशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून त्याच्या जवळची माहिती मिळविण्याचा कट रचतो. या कामासाठी इझनाची निवड करण्यामागचे खरे कारणही गुरू सांगतो. ते म्हणजे इझना व कबीर यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यामुळे फक्त इझना हीच कबीरकडून माहिती काढू शकते असे गुप्तहेर संस्थेचा प्रमुख सांगतो. आपल्याला अचानक सोडून गेलेल्या प्रियकराला धडा शिकवायला हवा म्हणून इझनासुद्धा कटात सामील होते. इझना कट यशस्वी करते का, कबीर पकडला जातो का, यावर चित्रपट बेतलेला आहे.  भट कॅम्पचा चित्रपट असल्यामुळे संगीताची बाजू भक्कम असेल या आशेने चित्रपटगृहात जाल तर एखाद-दोन गाण्यांव्यतिरिक्त फारसे काही हाती लागणार नाही.
 सनी लिऑनचा पहिला हिंदी चित्रपट असल्यामुळे तिच्याकडून अभिनय चांगला करण्याची अपेक्षा कुणीच ठेवणार नाही. श्रीलंकेतील निसर्गरम्य दृश्ये तितक्याच नजाकतीने छायालेखकाने कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत. कबीरविरुद्धच्या कटामध्ये इझनाला विचारणा केली जाते तेव्हा कबीरच्या आठवणी जाग्या होतात आणि चित्रपट ‘फ्लॅशबॅक’मध्ये जातो.
आपला माजी प्रियकर एक भयंकर खुनी आहे हे इझनाला सुरुवातीला पटत नाही. परंतु कबीर अचानक तिला सोडून गेला या शल्याचा वचपा काढण्यासाठी इझना कबीरविरुद्धच्या कटात सामील होते. ‘फ्लॅशबॅक’द्वारे कबीर-इझना यांचे प्रेम दाखविले आहे. गाण्यांच्या पाश्र्वभूमीवर प्रणयप्रसंग चित्रित केले आहेत. त्यासाठी निसर्गरम्य वातावरणाचा छान वापर केला आहे हे पूजा भटच्या दिग्दर्शनातील जमेची बाजू म्हणता येईल, परंतु या नेत्रसुखद चित्रणाचे श्रेय छायालेखकालाच द्यावे लागेल. रणदीप हुडाची व्यक्तिरेखा नीट समजण्यासाठी तो किती थंड डोक्याने खून करतो हे दाखविणारा प्रसंग हवा होता. कथानकातले सगळे नाटय़ प्रत्यक्ष प्रसंगांऐवजी संवादातून उलगडले आहेत. गुप्तहेर संस्थेचा अधिकारी म्हणून अरुणोदय सिंगचे व्यक्तिमत्त्व योग्य दिसते, परंतु इझनाच्या प्रेमात पडल्यानंतर ती निघून जाणार या विचाराने अयान ढसाढसा रडतो हा प्रसंगच प्रेक्षकाला विनोदी वाटतो.   
जिस्म २ : निर्माते – पूजा भट, डिनो मोरिया, दिग्दर्शक – पूजा भट, लेखक – महेश भट, छायालेखक – भाव्या, संगीत – आकरे मुखर्जी, मिथुन, कलावंत – सनी लिओन, रणदीप हुडा, अरुणोदय सिंग, आरिफ झकेरिया व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा