अभिनेता जितेंद्र जोशीनं त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत एक पोस्ट शएअर केली आहे. यात त्याने आपला मित्र निशिकांत कामतला श्रद्धांजली वाहिली आहे.
जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा दिग्दर्शक आणि आमचा मित्र, निशिकांत कामत यांच्या द्वितीय स्मृतिदिनी, आज आम्ही आमच्या लाडक्या ‘गोदावरी’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत आहोत..! जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट ‘गोदावरी..’ ११ नोव्हेंबर २०२२ पासून सर्व चित्रपटगृहांत, असे जितेंद्र जोशीने हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे.
जितेंद्र जोशी व्हिडीओत काय म्हणाला?
“आपला एखादा मित्र आपल्याला सोडून निघून गेल्यानंतर त्याच्या असण्याविषयी खूप काही वाटू लागतं. निशी, आज तुला जाऊन दोन वर्ष झाली. तू निघून गेल्यानंतर एक अस्वस्थता तयार झाली. तुझ्याशी पुन्हा बोलण्याच्या प्रयत्नात गोदावरी आणि त्यातला निशिकांत हाती लागला.
तुझं चित्रपटावर आणि या माध्यमावर खूप प्रेम होतं. तसेच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचावा यासाठी तू नेहमी प्रयत्नशील राहिलास. तत्पर होतास. आज तुझ्या दुसऱ्या स्मृतीदिनी गोदावरीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतोय. आपला गोदावरी येतोय ११ नोव्हेंबर २०२२ रोजी फक्त चित्रपटगृहात. तू मनात आहेसच आणि सोबतही. आय लव्ह यू. आय मिस यू निशी…”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.
या चित्रपटात गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्याचसोबतच नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले या कलाकारांच्या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तसेच प्राजक्ता देशमुख आणि निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथी लिहिली आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.