Comedian Sunil Pal Kidnapping Story: कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरण प्रकरणात आता नवनवे खुलासे समोर येत आहेत. मागच्या आठवड्यात सुनाल पाल यांचे उत्तर प्रदेशमधील पाच आरोपींनी अपहरण केले होते. हरिद्वार येथे कॉमेडी शो करण्याचे खोटे आमंत्रण देऊन सुनील पाल यांची फसवणूक करण्यात आली. अपहरणकर्त्यांनी सुनील पाल यांना सांगितले की, ते बेरोजगार आहेत. त्यांना वीस लाख रुपयांची खंडणी हवी आहे. मात्र सुनील पाल यांच्या मित्राने त्यांना ७.५ लाख रुपये दिले. आरोपींनी या पैशांतून दागिने विकत घेतले. चांगली नोकरी मिळाल्यानंतर आम्ही पैसे परत करू, असेही आरोपींनी सांगितले. तसेच मुंबईला परतण्यासाठी आरोपींनी सुनील पाल यांना रोख २० हजार रुपयेही दिले.
कॉमेडियन सुनील पाल हे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. त्यांना हरिद्वार येथे कॉमेडी शो करण्याचे निमंत्रण पाल यांना देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना आगाऊ रक्कमही दिली गेली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुनील पाल म्हणाले की, सुरुवातीला मला काहीच गडबड वाटली नाही. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मागच्या सोमवारी मी दिल्ली विमातळावर उतरल्यानंतर त्यांनी मला घ्यायला चारचाकी वाहन पाठवले. मेरठला पोहोचल्यानंतर त्या लोकांनी मला बळजबरीने दुसऱ्या वाहनात बसविले. त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मी त्यांना सहकार्य न केल्यास ते मला विषारी इंजेक्शन देतील, अशी धमकी दिली.
u
सुनील पाल पुढे म्हणाले, “विषारी इंजेक्शनची धमकी देऊन त्यांनी माझ्याकडून २० लाखांची खंडणी मागितली. पण मी ७.५ लाखांची कशीबशी सोय करून आरोपींनी जे दोन बँक खाती दिली, त्यात पैसे वळते केले. त्यानंतर त्यांनी मला मुंबईला परतण्यासाठी २० हजार रुपयांची रोकड देऊन पाठवले. तसेच जेव्हा त्यांना काम मिळेल, तेव्हा ते माझे पैसे परत करतील, असेही आरोपींनी सांगितले.” हे संपूर्ण प्रकरण अतिशय धक्कादायक होते, पण मी सुरक्षित घरी परतलो, याचा आनंद वाटतो. आरोपींकडून सुटका होताच, त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.
दोन ज्वेलर्सवर कारवाई
दरम्यान मेरठमध्ये आकाश गंगा आणि अक्षत ज्वेलर्स या दोन दुकानदारांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण अंगाशी येईल, अशी भीती त्यांना वाटते. अक्षत ज्वेलर्सचे मालक अक्षत सिंघल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, दोन जण माझ्या दुकानात आले आणि त्यांनी सुनील पाल यांच्या नावाने दोन सोन्याची नाणी आणि सोन्याची चैन विकत घेतली. त्यांनी २,२५,५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. व्यवहार अतिशय उघड असल्यामुळे संशय घेण्याचे काही कारण नव्हते.
सिंघल पुढे म्हणाले की, बुधवारी मला मुंबई पोलिसांकडून फोन आला. पण मला सायबर फ्रॉडचा संशय आल्यामुळे माहिती दिली नाही. त्यानंतर आमचे बँक खाते गोठविण्यात आले. पण जेव्हा आम्हाला याची गंभीरता कळली तेव्हा मी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्हाला खंडणीच्या रकमेतून सदर खरेदी केली असल्याचे समजले. याप्रकारची खरेदी त्यांनी इतरही दुकानात केल्याचे नंतर कळले.