‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर आणि पॉप सिंगर जो जोनस यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरु आहेत. जो आणि सोफी लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. सोफी ही ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची जाऊबाई आहे, तर जो हा निक जोनसचा मोठा भाऊ आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री सोफी टर्नर आणि पॉप सिंगर जो जोनस यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. जो जोनस घटस्फोटाबाबत लॉस एंजेलिसमधील वकिलांशी सल्लामसलत करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांच्याही वैवाहिक जीवनात समस्या सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : ‘गदर २’ची ५०० कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ दोन चित्रपटांना टाकलं मागे
अलीकडेच जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये जो जोनस आणि सोफीला एकत्र पाहिलं गेलं होतं. जोनस ब्रदर्सच्या अनेक कॉन्सर्ट्सला सोफी आवर्जून उपस्थित राहायची. त्यामुळे घटस्फोटाच्या वृत्ताने त्यांचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. याशिवाय या जोडप्याने त्यांचं मियामी शहरातील घरदेखील विकलं आहे. मात्र, सोफी आणि जो यांच्या विभक्त होण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
जो जोनस आणि सोफी टर्नरच्या या प्रेमकहाणीला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या जोडप्याने २०१७ मध्ये साखरपुडा आणि २०१९ मध्ये लग्न केलं. २०२० मध्ये पहिल्या आणि २०२२ मध्ये सोफीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. या जोडप्याने मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. सोफी टर्नर ही हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘द गेम ऑफ थ्रोन्स’साठी तिला तीन वेळा मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘टाइम फ्रीक’, ‘अनदर मी’, ‘जोशी’, ‘डार्क फोनिक्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तसेच जो जोनस हा प्रसिद्ध पॉप सिंगर म्हणून ओळखला जातो.