‘शुटआऊट अ‍ॅट वडाळा’मध्ये वास्तवावर आधारीत मन्या सुर्वेची भूमिका साकारायला मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीत नवीन ओळख मिळेल, अशी भावना  आपल्या उत्कृष्ट शरीरसौष्ठवासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केलीये. या चित्रपटामध्ये जॉन एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
१९८२ मध्ये मुंबईच्या वडाळा उपनगरात अंडरवर्ल्डमध्ये कार्यरत असलेल्या मन्या सुर्वे या गॅगस्टरचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. पोलिसांकडील नोंदीनुसार मुंबई शहरातला हा पहिला एन्काउंटर होता, असे सांगितले जाते.
बुधवारी संध्याकाळी पत्रकारांशी मारलेल्या गप्पांमध्ये जॉनने सांगितले की, मन्या सुर्वेची कहाणी खूप रोमांचक असून, या चित्रपटातील त्याची भूमिका वेगळ्या प्रकाराची आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एका नव्या रूपातला जॉन अब्राहम बघायला मिळेल. त्याच्यासाठी ही एक नवीन सुरुवात असून, त्याने केलेल्या वेगळ्या प्रयत्नांना प्रेक्षक नक्कीच पसंत करतील, अशी त्याला आशा आहे. तो म्हणाला, या चित्रपटात काम करतांना पहिल्यांदाच त्याने जॉन अब्राहम अशी स्वतःची ओळख मागे ठेवली. त्याने साकारलेला मन्या सुर्वे प्रेक्षक लक्षात ठेवतील आणि चित्रपटाला नक्कीच पसंती देतील.
‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ या चित्रपटाआधी जॉन अब्राहमचा ‘आय मी और मैं’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.

Story img Loader