जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या नात्यात ‘दरार’ निर्माण झाल्यानंतर लगेचच त्याच्याबरोबर एक तरुणी नित्यनेमाने दिसू लागली होती. प्रिया रुंचाल नावाची ही तरूणी व्यवसायाने बँकर आहे आणि सध्या जॉनचे भावविश्व तिच्याभोवती गुंफले गेले आहे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली. मात्र, ही प्रिया कोण, कशी आणि आपल्याला कुठे भेटली?, याचा थांगपत्ताही जॉनने कोणाला लागू दिला नव्हता. नव्या वर्षांसाठीच्या शुभेच्छा देताना त्या जॉन आणि प्रिया अब्राहम या नावाने दिल्या जाव्यात, इतपर्यंत हे प्रकरण त्याने दडपून ठेवले.
जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल यांचे गुपचूप शुभमंगल पार पडले आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी अमेरिकेत पोहोचलेल्या या जोडप्याने आपल्या निवडक नातेवाईकांच्या साक्षीने तिथेच शुभमंगल उरकून घेतले. जॉनने प्रसिद्धीमाध्यमांना विवाहाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. भारतात परतल्यानंतर त्याने ट्विटरवर सगळ्यांना २०१४ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या देतानाच शुभेच्छूक म्हणून जॉन आणि प्रिया अब्राहम असा थेट उल्लेख केल्यानंतर त्याचा हा सगळा छुपा बेत त्याला हव्या त्या पद्धतीनेच उघड केला आहे.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू हे जोडपे नऊ वर्षे प्रेमात होते. मात्र, त्यांच्यात नेमके काय बिनसले हे कोणालाही कळू शकले नाही. पण, बिपाशाबरोबरचे संबंध बिघडल्यानंतर काही दिवसांतच जॉन आणि प्रिया रुंचाल एकत्र फिरताना दिसू लागल्यावर शंकेचे सूर निघू लागले होते. किंबहुना, प्रिया आणि जॉन एकत्र असल्याची बातमी कळताच बिपाशालाही धक्का बसला. आपल्या आणि जॉनच्या नात्यातले सूर बिघडण्याचे कारणच प्रिया होती. ती आपलीही जिममधली मैत्रीण होती आणि त्या दोघांनी मिळून आपल्याला फसवले. जॉनने आपल्याला त्याच्या या नव्या नात्याबद्दल अंधारात ठेवल्याचेही बिपाशाने सांगितले होते. पण, जॉनने मात्र यापैकी कुठल्याच गोष्टींवर कधीही भाष्य केले नाही. उलट, आपल्या नव्या प्रेयसीला प्रसारमाध्यमांपासून लांब ठेवणेच त्याने पसंत केले होते. त्यात त्याने प्रियाबरोबर गुपचूप शुभमंगल उरकल्याने बिपाशाच्या म्हणण्यात तथ्य होते की काय, अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.