ऐश्वर्या राय-बच्चनचा पुनरागमन चित्रपट नेमका कोणता असणार यावर सध्या बराच खल सुरू आहे. ऐश्वर्या दक्षिणेतील दिग्दर्शक पी. वासू यांच्या अ‍ॅक्शनपटातून पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. त्यात दिग्दर्शक मणिरत्नमनेही तिला आपल्या नवीन चित्रपटाचा प्रस्ताव पाठवला असून त्यालाही तिने होकार दिल्याचे सांगितले गेले. आणि मग संजय गुप्ताच्या ‘जजबा’ या अ‍ॅक्शनपटातून ती पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरू झाली. गंमत म्हणजे तीसुद्धा खरी असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने आता तिच्या या हिंदी चित्रपटाचा नायक कोण असेल यावरून गप्पा रंगण्याआधीच दिग्दर्शकाने आपल्या नायकाचे नाव जाहीर केले आहे. ‘जजबा’ हा अ‍ॅक्शनपट असून ऐश्वर्याला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट करणार असल्याचे संजय गुप्ताने याआधीच जाहीर केले होते. या चित्रपटाची घोषणाही मागच्या वर्षीच्या कान महोत्सवात करण्यात आली होती. मात्र, अजून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झालेले नाही. जानेवारी २०१५ मध्ये या चित्रपटाला सुरुवात होणार असल्याचे समजते. या चित्रपटात ऐश्वर्याचा नायक म्हणून संजय गुप्ताने आपला आवडता अभिनेता जॉन अब्राहमला पसंती दिली आहे. जॉन अब्राहमने याआधी संजय गुप्ताबरोबर ‘जिंदा’ आणि ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटांमध्ये कोम केले असून त्याच्या आगामी ‘मुंबई सागा’तही तो काम करतो आहे. त्यामुळे, ऐश्वर्याचा नायक कोण, या प्रश्नावर दिग्दर्शक म्हणून संजय गुप्ताने जॉनला पहिली पसंती दिली. जॉननेही चित्रपटाला होकार दिला आहे. जॉन आणि ऐश्वर्या याआधी श्रीराम राघवनच्या ‘हॅप्पी बर्थ डे’मध्ये एकत्र येणार होते. मात्र, तो चित्रपट सुरूच होऊ शकला नाही. तो योग आता ‘जजबा’मधून येत आहे.

Story img Loader