बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे या वर्षी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार असून जॉन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान जॉनने  त्याच्या सोशल मीडियावर एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

जॉनला पहिल्यापासून बाइकचे फार वेड आहे. तसेच वेगवेगळ्या बाइक चालवून बघण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यातच या बाइकवेड्या जॉनचा आगामी चित्रपट बाइकर्सच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. परंतु चित्रपटाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. ‘एक कथा जी माझ्या हृदयाजवळ आहे. या कथेच्या प्रवाला सुरुवात करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जुलै २०१९ पासून सुरुवात होणार आहे’ असे जॉनने ट्विट केले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शन रेंसिल डिसिल्वा करणार असून अजय कपूर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच जॉनचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ आणि आगामी चित्रपट ‘रॉ’ची निर्मिती देखील अजय कपूरनेच केली आहे. आता तिसऱ्यांदा जॉन आणि अजय एकत्र काम करणार आहेत.

जॉनचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तसेच जॉनसोबत मोनी रॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉनचे ‘पागलपंती’ आणि ‘बाटला हाऊस’ हे चित्रपट देखील २०१९मध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे जॉनसाठी  हे आणि आगामी वर्ष खूप खास ठरणार हे नक्की.

Story img Loader