बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर आपली पीळदार शरीरयष्टी दाखविणे आता काही नवीन राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी दारासिंह किंवा खरेखुरे पैलवान पडद्यावर पाहायला मिळत. धर्मेंद्र, विनोद खन्ना यांनीही आपले पीळदार शरीर दाखवले. गेल्या काही वर्षांत ‘सीक्स पॅक्स’ आणि ‘एट पॅक्स’चा जमाना आला असून आत्ताच्या पिढीतील अभिनेते या प्रकारात आपले शरीरसौष्ठव दाखवीत आहेत. अभिनेता जॉन अब्राहम याच्या ‘रॉकी हॅण्डसम’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून बॉलीवूडमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहे.

सुनील शेट्टी, अक्षयकुमार, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान आदी मंडळींनी ‘पॅक्स’च्या प्रकारातून पडद्यावर आपली शरीरयष्टी दाखविली होती. अभिनेत्यांची पीळदार शरीरयष्टी प्रेक्षकांना दाखविणे हा जणू हिंदी चित्रपटातील आता नियमित कल झाला आहे.

जॉन अब्राहमचे आगामी चित्रपटातील पोस्टरही असेच आहे. या पोस्टरमध्येही जॉन अब्राहम याने आपला संपूर्ण ‘लूक’ दाखविणे टाळले आहे. यात तो पाठमोरा दाखविला असून पीळदार शरीरयष्टीच्या जॉनच्या दोन्ही हातात चाकू दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट पूर्णपणे ‘अ‍ॅक्शनपट’ असणार आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मराठमोळ्या निशिकांत कामत याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन अब्राहम चित्रपटाचा सहनिर्माता असून हा चित्रपट येत्या २५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader