अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती संस्था ‘जेए एन्टरटेन्मेन्ट’ आणि सुनीर क्षेत्रपालची ‘आझुरे एन्टरटेन्मेन्ट’ यांच्या संयुक्तविद्यमाने प्रसिद्ध कोरियन चित्रपट ‘दी मॅन फ्रॉम नोवेअर’ या २०१० सालच्या चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक करण्यात येत आहे. ‘रॉकी हॅण्डसम’ नावाच्या या चित्रपटात जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असून, तो अनेक दृष्ट माणसांना यमसदनी पाठविणाऱ्या ‘किलिंग मशिनच्या’ रुपात दिसणार आहे. जॉन अब्राहम त्याच्या हाणामारीच्या दृष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटात तो ड्रग्ज माफियांचा खातमा करताना दिसणार आहे. चित्रपटात एका आठ वर्षाच्या मुलीला तिच्या आईसमवेत ड्रग्ज माफिया पळवून नेतात. या मुलीबरोबर जॉनचे जिव्हाळ्याचे संबंध दाखविण्यात आले आहेत. मुलीच्या आईची भूमिका श्रूती हसन करीत असून, मुलीचा अभिनय करणाऱ्या बालकलाकाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मुळ कोरियन चित्रपटावरून तयार करण्यात येणाऱ्या या चित्रपटाला बॉलिवूडपटाच्या अंदाजात बनविण्यात येणार असून, चित्रपटात चार गाणी आहेत. दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा ‘रॉकी हॅण्डसम’ हा चित्रपट २०१५ मधील फेब्रुवारी महिन्याच्या ६ तारखेला चित्रपटगृहात झळकणार आहे.

Story img Loader