‘पायरेट्स ऑफ द कॅ रेबियन’ फेम जॉनी डेपने अभिनेत्री अम्बर हर्डवर ५० कोटी अमेरिकी डॉलर्सचा दावा ठोकला आहे. अम्बर हर्ड सुपरस्टार जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी असून तिने जॉनीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळेच दोघांनी घटस्फोट घेतला होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले, परंतु कोर्टात मात्र अम्बर हर्डला जॉनी डेपविरोधात कोणताही पुरावा सादर करता आला नाही. परिणामी पुराव्यांअभावी जॉनीला निर्दोष मुक्त करण्यात आले. २०१७ पासून सुरू असलेले हे प्रकरण एवढय़ावरच थांबेल अशी अपेक्षा होती, परंतु या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आता जॉनी डेपनेच त्याचा मानसिक छळ आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी अम्बर हर्डवर मानहानीचा दावा ठोकला असून हा दावा तब्बल ५० कोटी अमेरिकी डॉलर्सचा आहे.
२०१७ पासून हॉलीवूड सिनेसृष्टीत ‘# मी टू’ ही चळवळ पुन्हा एकदा सुरू झाली. या चळवळीअंतर्गत मायकेल हॅनेके, हार्वे वेनस्टेन, रायन अॅडम्स, जेफ फॅगर यांसारख्या अनेक मोठय़ा पुरुष कलाकार, निर्माते-दिग्दर्शक यांच्यावर मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप केले गेले होते. या यादीत सुपरस्टार जॉनी डेपचेदेखील नाव होते. त्याच्यावर आरोप करण्यात त्याची घटस्फोटित पत्नी अम्बर हर्ड अग्रेसर होती. जॉनीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यात ‘# मी टू’अंतर्गत होणारे आरोप आणि त्याच दरम्यान पत्नीविरोधात कोर्टात सुरू असलेला खटला यामुळे जॉनी मानसिकदृष्टय़ा पार खचून गेला. सातत्याने होणाऱ्या या आरोपांमुळे जॉनीची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. परिणामी त्याला मिळणारे कामही कमी झाले. त्याच दरम्यान ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ आणि ‘फॅन्टास्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड’ या बिग बजेट चित्रपटांमध्ये त्याला प्रमुख भूमिका साकारण्याचे काम मिळाले. परंतु त्याच दरम्यान ‘मी टू’ चळवळीचा प्रभावही पहिल्यापेक्षा जास्त वाढला होता. त्यामुळे अत्याचाराचे आरोप असलेल्या जॉनीला चित्रपटात काम दिल्याप्रकरणी या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकांवर बहिष्कार घालण्यात यावा असे वातावरण तयार झाले. हे वातावरण तयार करण्यात अम्बर हर्डचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे दोघांमधील तणाव आणखी वाढला. या तणावाचे परिणाम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यावरही झाले. दरम्यान अम्बरला जॉनीने केलेल्या अत्याचारासंदर्भात सबळ पुरावे सादर करता आले नाहीत त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गेले दोन वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाचा पहिला अंक संपला असून जॉनी डेपच्या आरोपांमुळे आता दुसरा अंक सुरू झाला आहे.