अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आजवर घेतलेले बराक ओबामा यांच्या योजना रद्द करण्यापासून ते मुस्लिमांना अमेरिकेत येण्यावर बंदीपर्यंतचे सर्वच निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. अमेरिकेत काहींनी या निर्णयांचे स्वागत केले तर काहींनी टीका केली. यात हॉलीवूड सेलेब्रिटीही मागे नाहीत. आतापर्यंत ऑस्कर, ग्रॅमी या मनोरंजन क्षेत्रातील नामांकित पुरस्कार सोहळ्यांतून मेरिल स्ट्रीप, जिमी किमेल, अर्नाल्ड श्वर्जनेगर, रॉबर्ट डी निरो यांसारख्या अनेक हॉलीवूड सुपरस्टार्सनी त्यांच्या या निर्णयाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यात ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ फेम जॉनी डेपचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वी डेपने ट्रम्प यांच्याविरोधात खळबळजनक विधान केले होते. मात्र आता याच विधानासाठी त्याने ट्रम्प यांची माफी मागितली आहे. जॉनीने एका जाहीर कार्यक्रमात एका कलाकाराने ज्या राष्ट्रपतींची हत्या केली ते कोण होते?, असा प्रश्न विचारला. यावर प्रेक्षकांतील एकाने १८६५ साली अब्राहम लिंकन यांची हत्या करण्यात आली होती हे उत्तर देताच आपणही लिंकन यांची हत्या करणाऱ्या जॉन बूथपेक्षा कमी नाही, असे सांगत खऱ्या आयुष्यात किमान एक व्यक्तीला मारायची इच्छा आहे आणि ती व्यक्ती निवडताना डोनाल्ड ट्रम्प हे नाव अग्रस्थानी असेल, असे गमतीने सांगितले होते. मात्र ट्रम्प प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. आणि लगेचच आपले शब्द मागे घे अन्यथा एका मोठय़ा कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा अशी एक नोटीस त्याला ‘व्हाइट हाउस’मधून पाठवण्यात आली. या जलद नोटिशीमुळे घाबरलेल्या जॉनने लगेचच ट्रम्प यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
जॉनी डेपकडून ट्रम्प यांची माफी
ट्रम्प यांची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 02-07-2017 at 04:51 IST
TOPICSमंदार गुरव
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Johnny depp donald trump hollywood katta part