हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपला सध्या काम मिळत नाहीये, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण त्याने शेअर केलेला व्हिडीओ आहे. हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप नुकताच एमटीव्ही म्युझिक व्हिडिओ अवॉर्ड्समध्ये पोहोचला. यादरम्यान तो अंतराळवीराच्या गेटअपमध्ये गर्दीत शिरला. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्याठिकाणी जॉनीने केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमादरम्यान जॉनीने काही विनोद केले होते. त्यापैकी एका विनोदात “मला कामाची गरज आहे,” असं तो म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ आणि वक्तव्य चर्चेत आहे.
जॉनी डेपने स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत “ओळखा कोण?” असं कॅप्शनमध्ये लिहिलंय. तसेच व्हिडीओमध्ये जॉनी म्हणाला, “मी वाढदिवस, बॅट मिट्झवाह, लग्न, जागरण यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी मी हवा असेल, तर मी उपलब्ध आहे. तसेच मी डेंटिस्टही आहे,” असंही जॉनीने म्हटलंय.
या व्हिडीओमध्ये जॉनीचा चेहरा स्पेस हेल्मेटच्या आत डिजिटली माउंट केलेला दिसतो. जॅक हार्लो, फर्गी आणि लिझो यांच्या परफॉर्मन्सनंतर जॉनी प्रुडेंशियल सेंटर एरियावर डिजिटली उडताना दिसत होता. दरम्यान, जॉनी डेपच्या या व्हिडीओंनी इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हार्ट आणि फायर इमोजी कमेंट केल्य आहेत. “जॉनी तुला पाहून आनंद झाला!” असं एका युजरने म्हटलंय.
जॉनीने या वर्षी कोणताही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड जिंकला नाही. पण तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत पाच वेळा या पुरस्कारांचा विजेता ठरला आहे. त्याला बेस्ट मेल परफॉर्मर, बेस्ट व्हिलेन, ग्लोबल स्टार आणि २०१२ मध्ये जनरेशन पुरस्कार देण्यात आला होता.