गेल्या शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आर्यनला पाठिंबा दिला आहे. पण जॉनी लिव्हर यांनी आर्यनला पाठिंबा देणे चाहत्यांना आवडले नाही. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
जॉनी लिव्हर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी शाहरुख सोबतचा कुछ कुछ होता है चित्रपटातील एक फोटो शेअर करत पाठिंबा दिला होता. पण त्यांनी आर्यनला पाठिंबा देणे नेटकऱ्यांना आवडले नाही. नेटकऱ्यांनी जॉनी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा : रवीना टंडनचा आर्यन खानला पाठिंबा; म्हणाली, “लाजिरवाणे…”
एका यूजरने ‘ड्रग्ज पॉवर’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘बास करा आता, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही’ असे म्हणत जॉनी लिव्हर यांना ट्रोल केले आहे. ‘हाहाहा… बॉलिवूड नेहमी गुन्हेगारांना पाठिंबा देतात’ असे तिसऱ्या एका यूजरने म्हटले आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यनला पाठिंबा दिला होता. ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो’ असे म्हणत ऋतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला होता.