बॉलीवूडचा खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा केवळ २५ टक्के प्रतिसाद चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाला होता. खरं तर शुक्रवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले जात होते. पण, शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसली. अक्षयच्या ‘जॉली एलएलबी २’ ने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला पार केला आहे.

प्रदर्शनापूर्वी कायदेशीर बाबींमुळे चर्चेत आलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३.२० कोटी, दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी १७.३१ कोटी तर तिस-या दिवशी रविवारी १९.९५ कोटींचा गल्ला जमविला.  प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून  ‘जॉली एलएलबी २’ च्या कमाईचा आकडा ट्विट केला आहे. दरम्यान, भारतात चांगली कमाई करत असलेल्या या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळा निर्माण केला आहे. पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी या समितीची चित्रपटाला परवानगी मिळावी लागते. मात्र समितीने चित्रपटाला हद्दपार केल्याचे दिसते. चित्रपट वर्तुळात रंगणाऱ्या चर्चांनुसार या चित्रपटामध्ये काश्मिरचा मुद्दा असल्यामुळे चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये. लखनऊमधील रहिवासी जगदिश्वर मिश्र (अक्षय कुमार) याला वकिलीच्या करिअरमध्ये मोठं काहीतरी करायचं आहे. पण घरच्या स्थितीमुळे त्याला एका ज्येष्ठ वकिलाच्या कार्यालयात दुय्यम स्वरुपाचं काम करावं लागतं. पण त्याच्यातील जिद्द कायम आहे. लखनऊमधील न्यायालयात स्वतःच स्वतंत्र चेंबर असावं, अशी इच्छा त्याची असते. त्यासाठी लागणारा पैसाही त्यानं जमवलेला असतो. पण ऐनवेळी तो कमी पडतो. मग खोटं बोलून तो न्यायालयात त्याला रोज भेटणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका महिलेची फसवणूक करून तिच्याकडून पैसे घेतो. यानंतर काय घडते. त्यातून पुढे कथानकाला कशी वळणे मिळतात. खुद्द जगदिश्वर मिश्र याच्यावर काय काय संकटे कोसळतात… या सगळ्यातून ‘जॉली एलएलबी २’ची कथा पुढं जाते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.