साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच ‘गुढीपाडवा’. या शुभदिनी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. याच दिवसाचे औचित्य साधून ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट’ या मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने गुढीपाडवा साजरा करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली.

‘जजमेंट’ हा थरारक चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव देणारा असणार आहे. चित्रपटाची मुख्य कथा काय असेल हे गुलदस्त्यात असले तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरून हा चित्रपट नक्कीच एक रोमांचकारी अनुभव देणारा असेल यात शंका नाही.

या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान प्रथमच एकत्र झळकणार आहे. एका वेगळ्याच भूमिकेतून हे दोघे प्रेक्षकांसमोर येणार आहे. यांना चित्रपटात बघतांना रसिक नक्कीच आश्चर्यचकित होणार हे नक्की. या चित्रपटात ‘श्री पार्टनर’ फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.

निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या “ऋण” कादंबरीवर आधारित हा चित्रपट समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केला असून डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Story img Loader